माझ्या १७ वर्षांच्या आयुष्यात माझ्या ७ वाढदिवसांना आणि २० कार्यक्रमांना वडील आमच्यासोबत नव्हते. पण सैन्यात काम करत असताना आमच्याआधी देशसेवा महत्त्वाची आहे. आर्मीच्या वातावरणात वाढल्याने आम्ही लोकांना शेकहॅंड करण्याआधी सॅल्यूट करतो, एकमेकांना हॅलो म्हणण्याआधी आम्ही जय हिंद म्हणतो आणि या समळ्याचा मला अभिमान आहे असे अवघ्या १७ वर्षांची आशना लिद्दर एका व्हिडियोमध्ये म्हणाली. तमिळनाडू येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात आशना हिचे वडील ब्रिगेडीयर लखविंदर सिंग लिद्दर यांचा मृत्यू झाला. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या १३ जणांमध्ये ब्रिगेडीयर लिद्दर यांचा समावेश होता. या अपघातानंतर देशवासियांनी मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली. पण आपण सुखरुप राहण्यासाठी सैन्यदलातील जवान आणि त्यांचे कुटुंबिय किती त्याग करतात याची पुन्हा एकदा प्रचिती आली.
माझे वडील माझ्यासाठी हिरो होते, ते माझे बेस्ट फ्रेंड होते. ते माझ्यासाठी जगातले सर्वात मोठी प्रेरणा होते, माझ्यासाठीच नाही पण त्यांच्या आजुबाजूच्या प्रत्येकासाठी ते प्रेरणा होते. त्यांच्यासोबतच्या चांगल्या आठवणी कायम आमच्या सोबत राहतील. असे म्हणत आशना वडिलांच्या आठवणीने भावूक होते. वडीलांचे छत्र हरपलेल्या आशनाला आपल्या वडिलांबद्दल बोलताना आठवणीने बांध फुटत होता. या अपघातानंतर ब्रिगेडीयर लिद्दर यांच्या पत्नी गितीका स्वत:ला सावरतानाच ‘वडिलांसारखी धाडसी राहा’ असे सांगत, आशनाला समजावण्याचा प्रयत्न करत होत्या.
आशना म्हणते, सध्या मी १२ वी मध्ये असून ठरल्याप्रमाणे मी बोर्डाची परीक्षा देणार आहे. विशेष म्हणजे अवघ्या १७ वर्षांची असलेली आशना केवळ अभ्यास करत नाही तर लेखिका म्हणूनही तिची ओळख आहे. तिने ‘In Search of a Title: A Teenager's Journey of Trials, Tribulations, Musings and Learnings’ हे तिने लिहीलेले पुस्तक कविता रुपात असून नुकतेच नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. क्रिएटीव्ह क्रो पब्लिशरने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाला मोठी मागणी असून आता आम्ही आणखी प्रती छापत असल्याचे या प्रकाशकांकडून सांगण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. अपघातात मृत्यू झालेल्या सीडीएस बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांनीही आशनाच्या या पुस्तकाचे कौतुक करत आशनासारखी तरुण मुले पुढच्या पिढीचे शिलेदार आहेत अशी प्रतिक्रिया दिली होती.
हा अपघात घडण्याच्या १५ दिवस आधीच ब्रिगेडीयर लिद्दर आणि गितिका यांच्या लग्नाचा २५ वा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला होता. त्यावेळी “मागील २५ वर्षे मी पत्नीच्या आयुष्याचे नेतृत्व केले मात्र आता पुढच्या २५ वर्षात मी तिच्या पावलावर पाऊल टाकणार आहे”. असे म्हणणारे ब्रिगेडीयर लिद्दर यांचा अपघाती मृत्यू त्यांचे कुटुंबिय आणि मित्र परिवारासाठी खूपच धक्कादायक ठरला. आशनाबाबत 'इंडिया टुडे'शी बोलताना तिचा मित्र म्हणाला, ती अतिशय धाडसी आणि मजेत जगणारी मुलगी आहे. अभ्यासातही ती खूप हुशार आहे. तसेच इतर अॅक्टीव्हीटीजमध्येही तिचा नेहमी पुढाकार असतो. तर तिची मैत्रीण म्हणाली, ती नेहमी उत्साहात असते आणि सगळ्यांच्या मदतीसाठी धावते. ती अतिशय मनमिळावू असून आम्हाला तिच्यासारखी मैत्रीण असल्याचा आम्हाला अभिमान आहे अशा भावनाही तिच्या मित्रमंडळींनी व्यक्त केल्या.