सोशल मीडियावर गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळे फूड कॉम्बिनेशन्स व्हायरल होत आहेत. या खाद्यप्रयोगांना कधी तुफान प्रतिसाद मिळतो तर कधी नेटीझन्सकडून टिकेचा भडीमार होतो. जर तुम्ही दिल्लीतील पराठे वाली गलीला गेला असाल, तर बहुधा तुम्हाला तेथे उपलब्ध असलेल्या पराठ्यांच्या विस्तृत श्रेणीची माहिती असेल. (Food blogger tries candy crush parantha)
तिथले पराठे इतके प्रसिद्ध आहेत की दिल्लीच्या चांदनी चौकात असलेल्या एका गल्लीला परांठे वाली गली असे नाव देण्यात आले आहे. मिर्ची परांठा, पापड परांठा, भिंडी परांठा, मावा परांठा, अशा वेगवेगळ्या प्रकारचे पराठे तिथे उपलब्ध असतात.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरूणी पराठा खातेय. हा पराठा साधा पराठा नाही तर कँडी क्रश पराठा आहे. म्हणजेच पराठा तयार करणारी व्यक्ती पिठाचा गोळा घेऊन कँडीजचं स्टफिंग भरते आणि लाटायला सुरूवात करते.
चाहत आनंद म्हणून ओळखल्या जाणार्या फूड ब्लॉगरने ते चवदार आहे की नाही यावर भाष्य केले नाही पण तिने नमूद केले की ते खूप गोड आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओला 4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, 'हे अशा कोणाशी तरी शेअर करा जो हा कँडी क्रश परांठा ट्राय करेल'. 'किसी कँडी क्रश खेलने वाले का ही आयडिया होगा', असं कॅप्शन तिनं या इंस्टाग्राम रीलला दिलं आहे.