पाणी पुरी... बस नाम ही काफी है... गोलगप्पे (golgappe) म्हणजेच पाणी पुरी (pani puri) या स्ट्रीट फूडने (street food) जणू काही भारतीयांना वेड लावलं आहे. आठवड्यातून तीन चार वेळा किंवा अगदी रोजच न चुकता देवदर्शन घेतल्याप्रमाणे पाणीपुरीचा ठेला गाठून यथेच्छ पाणीपुरी खाणारेही अनेक खवय्ये आहेत. पुदिन्याचं तेजतर्रार पाणी आणि त्याच्या जोडीला चिंचेचं आंबट गोड पाणी, बटाट्याचं सारण म्हणजे आहाहा.... खाणाऱ्याने खातंच रहावा असा हा पदार्थ...
आता तिखट पाणीपुरी, गोड पाणीपुरी किंवा जलजीरा पाणीपुरी असे पाणीपुरीतल्या पाण्याचे वेगवेगळे फ्लेवर्सही खवय्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. काही काही ठिकाणी तर एकाच ठेल्यावर पाणीपुरीचे तब्बल १५- २० वेगवेगळे फ्लेवर्स मिळतात. इथपर्यंत तर सगळं ठिक आहे. पण हल्ली फायर पाणीपुरी हा नवाच प्रकार काही शहरांतून चाखायला मिळत आहे. फायर पान आपण ऐकलंय आणि ते आता बऱ्यापैकी आपल्याला माहितीच आहे. अशाच फायर फूड या पंक्तीत आता आपली प्रिय पाणीपुरी येऊन बसली आहे. फायर पाणीपुरीचा एक व्हिडियो सध्या सोशल मिडियावर भलताच गाजतो आहे.
एका तरूणीने फायर पाणीपुरीचा एक व्हिडियो इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केला आहे. पाणीपुरी म्हणजे आधीच अनेकांचा वीक पॉईंट आणि त्यात फायर पाणीपुरीचा भन्नाट ट्रेण्ड... त्यामुळेच तर हा व्हिडियो सध्या सोशल मिडियावर (social media) धूम करत आहे. अहमदाबादमध्ये एका पाणीपुरीच्या गाडीवर पाणीपुरी विक्रेत्याने वेगवेगळे पदार्थ घालून मस्त पाणीपुरी तयार केली. त्यानंतर या पाणीपुरीवर चक्क आग लावली आणि समोर ग्राहक म्हणून आलेल्या तरूणीच्या तोंडात अशी जाळ असलेली पाणीपुरी घातली. हा व्हिडियो पाहून क्षणभर आपण हैराण होतो, पण पाणीपुरी खाणाऱ्या तरूणीच्या चेहऱ्यावरची मजा पाहून मात्र आपल्यालाही ही फायर पाणीपुरी चाखून पाहण्याचा जाम मोह होतो. हा व्हिडियो सोशल मिडियावर चांगलाच हीट झाला असून अवघ्या काही दिवसांत व्हिडियोने हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळवल्या आहेत.