सध्या पावसाने सगळीकडेच चांगला जोर धरला आहे. त्यामुळे वातावरण अगदी थंड झालेलं आहे. थंड वातावरण आणि बाहेर कोसळणारा पाऊस, अशा वातावरणात चहाप्रेमींना चहाची आठवण नाही आली तरच नवल. म्हणूनच तर सध्या चहा, चहाप्रेम, वेगवेगळ्या चहाच्या रेसिपी (masala chai recipe) आणि चहाचे वेगवेगळे व्हिडिओ (viral video of tea) असं सगळंच सध्या सोशल मिडियावर ट्रेण्डिंग आहे.. अशातच एक परदेशी काकू त्यांच्या गोड भाषेत चहा पिण्याचा आग्रह करत आहेत, त्यामुळे भर पावसात चहा प्या म्हणणाऱ्या या बाई (Foreigner women selling Masala Tea) नेटकरी मंडळींना भारीच आवडल्या आहेत.
प्रत्येक प्रांताचे एक वेगळेच वैशिष्ट असते. तिथले पदार्थ, तिथल्या लोकांची आवड- निवड, तिथली भाषा आणि त्या भाषेचा लहेजा.. असं सगळंच आपल्या आपल्या प्रदेशाचं आपल्याला भारीच प्रिय असतं. जेव्हा एखादी बाहेरची व्यक्ती त्या प्रांतात नव्याने येते आणि खास आपल्या असणाऱ्या काही गोष्टी समजून घेण्याचा, शिकण्याचा मनापासून प्रयत्न करते, तेव्हा ती व्यक्ती विशेष आवडू लागते. या परदेशी बाईंचंही असंच झालं आहे. त्यांनी भारतात येऊन भारतीयांचा जीव की प्राण असलेला चहा आणि तो चहा विकण्याची चहा विक्रेत्यांची लकब या दोन्ही गोष्टी अगदी हुबेहुब हेरल्या आहेत. त्यामुळेच तर हा व्हिडिओ अनेकांना मनापासून आवडला आहे.
इन्स्टाग्रामच्या desiismybae या पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये जी परदेशी महिला दिसते आहे ती साधारण पन्नाशीच्या आसपासची असावी. ती चहा विकण्याचा हा प्रयोग बहुतेक तिच्या देशातच करत असावी असं तिच्या आजुबाजुला दिसणाऱ्या घरावरून, वस्तूंवरून वाटतं. खरंतर ती कुठेही रस्त्यावर किंवा हॉटेलमध्ये जाऊन चहा विकत नाहीये.
पेटता बाण ‘तिनं’ पायानं मारला, केला अचूक लक्ष्यभेद! पाहा व्हिडिओ- खाली डोकं-वर पाय
घरच्याघरी ती एखादी मिमिक्री करते आहे, असं वाटतंय. चहा विक्रेत्यांकडे चहाचे ग्लास ठेवायला जसं स्टॅण्ड असतं, तसंच तिच्या हातात आहे आणि त्यात चहा भरलेले ४ ग्लास आहेत. चाय गरम चाय, पियेंगे आप गरम गरम चाय, मेमसाब हमने आपके लिये स्पेशल चाय बनाया है, मसाला चाय... असा चहा पिण्याचा प्रेमळ आग्रह ती अतिशय लाघवी हिंदीतून करते आहे.