महिलांच्या नट्टा - पट्टा करण्याचा विषय येतो तेव्हा त्यांचे कपडे, बॅगा, मेकअप अशा अनेक गोष्टींचा विचार आपल्या मनात येतो. आपल्यापैकी बऱ्याच महिला वस्तू विकत घेताना ती कुठल्या ब्रॅण्डची आहे, तिची किंमत काय अशा साऱ्या गोष्टींकडे अतिशय काटेकोरपणे पाहतात. आजकाल ब्रँडचा जमाना आहे. ब्रँडेड कपडे, वस्तू वापरणे म्हणजे स्टेटस झालेले आहे. या वस्तू वापरणारे म्हणजे श्रीमंत, सुखवस्तू घरातले असे समजले जाते. अनेक असे ब्रँड आहेत ज्यांनी ग्राहकांच्या मनात विश्वास, समाधान व गुणवत्ता याची प्रतिमा निर्माण केली आहे व एक ट्रेडमार्क निर्माण केला आहे.
कपड्यांपासून ते कॉस्मेटिकपर्यंत आणि अगदी मोबाइलपासून कारपर्यंत प्रत्येक गोष्टीत ब्रँड बघितला जातो. ब्रँडेड वस्तू खरेदी करण्याकडेच लोकांचा कल असतो. निव्वळ स्टेट्स किंवा विश्वासार्हता म्हणून नव्हे तर, वर्षानुवर्षे वापरत असलेल्या एखाद्या ब्रँडशी अनेकदा भावनिक नातेही तयार होते. प्रत्येक खरेदी ही गरज म्हणून केली जात नाही. अनेकदा आवड म्हणून आपण बऱ्याच गोष्टी खरेदी असतो. त्यावेळी ब्रँडचा सर्वात जास्त विचार केला जातो. कारण त्या वस्तू घेण्यामागे आपल्या भावना असतात, आपली गरज नाही. सध्या अशाच एका आगळ्या - वेगळ्या हँन्डबॅगेची चर्चा नेटकऱ्यांमध्ये होत आहे. या बागेची नेमकी अशी काय खासियत आहे हे पाहूयात(French brand unveils limited edition ‘Mini Meteorite Swipe Bag’ made of real meteorites).
अशी आगळीवेगळी बॅग बनवणारा हा फ्रान्सचा नेमका कोणता ब्रँड ?
फ्रेंच लक्झरी ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोपर्नीने (Coperni) या आगळ्या - वेगळ्या हँन्डबॅगेचे अनावरण केले आहे. या विशिष्टय प्रकारच्या बॅगेला पाहून व तिची किंमत ऐकून सगळ्यांचेच डोळे आश्चर्याने विस्फारले जातात. आतापर्यंत फ़्रेंचच्या या सुप्रसिद्ध ब्रॅण्डने सर्वांचेच कोणत्या ना कोणत्या गोष्टींसाठी लक्ष वेधून घेतले आहे. एका फॅशन शो दरम्यान रोबोट्स आणि मॉडेल यांनी एकत्रित रॅम्प वॉक केला. त्यानंतर फ्रान्समधील एका मोठ्या फॅशन शोमध्ये बेला हदीद (Bella Hadid) या सुप्रसिध्द मॉडेलला चक्क नग्न अवस्थेत रॅम्पवर पाठवलं. बेला हदीद रॅम्पवर दाखल झाल्यानंतर तिच्यावर एका विशेष द्रवाची फवारणी करण्यात आली आणि १० मिनिटांच्या आत हे द्रव्य गोठत एक सुंदर असा ड्रेस तयार झाला. अशा अनेक नवनवीन प्रयोगासाठी फ्रान्सचा लक्झरी ब्रँड म्हणून 'कोपर्नी' ला जगभरात ओळखले जाते.
नक्की ही बॅग कशापासून बनली आहे ?
अलीकडेच, या ब्रॅण्डने उल्का खडकाचा वापर करून बनवलेल्या लिमिटेड एडिशनच्या हँन्डबॅगेजचे मोठ्या दिमाखात अनावरण केले आहे. या हँन्डबॅगेची किंमत तब्बल ४०,००० युरो म्हणजेच ३५ लाख रुपये इतकी आहे. या हँन्डबॅगेला 'मिनी मेटियोराइट स्वाइप बॅग' असे नाव देण्यात आले आहे. ही 'मिनी मेटियोराइट स्वाइप बॅग' गडद राखाडी दगडापासून बनलेलीआहे ज्यामध्ये उल्का समाविष्ट आहेत. कोपर्नीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या बॅगचे वजन सुमारे १. ८ किलोग्रॅम आहे आणि तिची एकूण उंची २३ सेंटीमीटर इतकी आहे. या बॅगेची ऑर्डर ही वैयक्तिकरीत्या घेतली जाईल. पृथ्वीवर कोठे व कोणत्या भागात उल्का पडली आहे याचा शोध लावून प्रत्येक ऑर्डरनुसार उल्का आणली जाईल व त्याचा वापर करुन ही बॅग तयार केली जाईल. या दुर्मिळ उल्का खडकाचा वापर करुन ही बॅग इटालियन कारागिरांच्या हातांनी बनविली जाणार असल्याची माहिती कोपर्नीच्या (Coperni) अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. 'मिनी मेटेराइट रॉक बॅग' ही फॉल/विंटर २३ कलेक्शनचा एक महत्वपूर्ण भाग आहे. उल्कांच्या खडकांपासून तयार झालेली ही हँन्डबॅग "एक अद्वितीय वस्तू आहे जी पुरातत्व, रचना, शास्त्रीय आणि आदिम कला यांचे एकत्रितरित्या एक उत्तम उदाहरण आहे" अशाप्रकारे या बॅगेचे वर्णन कोपर्नीने केले आहे.
छायाचित्रांत दर्शविलेली बॅग ही, ५५००० वर्षांपूर्वी पृथ्वीवर पडलेल्या उल्कांच्या खडकांपासून तयार केली असल्याची माहिती 'कोपर्नी' या ब्रॅण्डने दिली आहे. या बॅगची खरेदी करायची असल्यास, ही लिमिटेड एडिशन बॅग तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास सहा आठवडे लागतील. तसेच ही बॅग खरेदी केल्यानंतर आपण ती रिटर्न करु शकत नाही. ही बॅग खरंच उल्का खडकांपासून बनवली असल्याची खात्री करण्यासाठी या बॅगेसोबत आपल्याला त्याच्या सत्यतेचे प्रमाणपत्रही दिले जाते.