खरंतर गुगलवर कोण काय सर्च (google search) करेल काही सांगता येत नाही. पण साधारणपणे समान वयोगटातील व्यक्तींसमोरचे प्रश्न, अडचणी किंवा विषय थोड्या फार फरकाने सारखेच असतात. आता बऱ्याचदा असं होतं की आपल्या मनातला एखादा विषय आपण आपल्या कितीही जवळच्या व्यक्तीजवळ बोलूच शकत नाही. कधी असंही होतं की आपल्याला काहीतरी प्रश्न पडलेला असतो, पण तो विचारण्यासाठी योग्य व्यक्तीच आसपास नसते. मग अशावेळी आता आपण सर्रास गुगलची (FAQ's on Google) मदत घेतो आणि आपल्या मनातल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे तिथे शोधण्याचा प्रयत्न करतो.
अशाच गुगलला विचारल्या गेलेल्या अनेक प्रश्नांचा एक रिपोर्ट गुगलने नुकताच प्रसिद्ध केला आहे. यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील स्त्री- पुरुषांकडून आलेल्या प्रश्नांचा समावेश आहे. गुगलला विचारलेले काही सर्च की वर्ड एकत्र करून हा रिपोर्ट तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये तरुण अविवाहित मुलींनी गुगलला विचारलेले प्रश्न खूपच इंटरेस्टिंग आहेत. यामध्ये सगळ्यात जास्त विचारला गेलेला प्रश्न प्रेग्नन्सीबाबत आहे. अमूक एका गोष्टीमुळे मी प्रेग्नंट होईल का, ही भीती अनेक मुलींच्या मनात आहे.
तरुण सिंगल मुलींकडून सर्वाधिक विचारला गेलेला प्रश्न त्यांच्या बॉयफ्रेंडबाबत असतो किंवा त्यांच्या क्रशबाबत असतो. आपल्या बॉयफ्रेंडचे आपल्यावर खरंच प्रेम आहे का, आपला जो क्रश आहे, तो ही आपल्याला खरोखरंच लाईक करतोय का, असे प्रश्न विचारून तरुणी त्यांच्या ब्रॉयफ्रेंडला, क्रशला किंवा मित्राला चाचपडण्याचा प्रयत्न गुगलच्या मदतीने करताना दिसतात.
तिसरा प्रश्न आरोग्याविषयी असून यामध्ये तरुण मुली मासिक पाळीबाबतच्या अनेक शंका विचारताना दिसतात. पाळी नियमित येण्यासाठी काय करावे, पाळीमध्ये होणारा त्रास कमी करण्यासाठी उपाय, पाळी लवकर येण्यासाठी काय उपाय असे काही प्रश्नही मुली विचारताना दिसतात. यानंतरचे अनेक प्रश्न ब्यूटी, हेअर स्टाईल, फॅशन आणि फूड याबाबत आहेत. वजन कमी करण्यासाठी काय उपाय करावेत, परफेक्ट वेटलॉस फूड, कोणत्या पदार्थामध्ये किती कॅलरी असतात, असे प्रश्न विचारणाऱ्या तरुणींची संख्याही भरपूर आहे.