गणपती बाप्पा येणार म्हटले की घरोघरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या अंगात उत्साह संचारतो. लहान मुले आणि घरातील सगळेच बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी करतात. तर बाप्पाला बसायला चौरंग, त्यावर छान वस्त्र, त्याचे दागिने आणि त्याला आवडणारी खिरापत यांची तयारी आई करत असते. एकीकडे आजी वातींची आणि बाप्पाला आवडणाऱ्या पत्रींची यादी करण्यात व्यस्त असते. काही दिवसांसाठी बाप्पामय होऊन जाणारे घर बाप्पा गेल्यावर मात्र अगदी शांत शांत होऊन जाते. एकमेकांकडे आरतीसाठी जाणे मग त्याठिकाणी मिळणारा प्रसाद अगदी आवडीने खाणे आणि रात्री उशीरापर्यंत भजने किंवा गप्पांमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवणे हे चित्र आजही अनेक ठिकाणी पाहायला मिळते (Ganpati Festival Ganpati Bappa 2022 Preparation in Advance).
गणपती बाप्पा आल्यावर ऐनवेळी आपली धआंदल उडू नये म्हणून आधीपासून काही गोष्टींची तयारी असलेली केव्हाही चांगली. आपण बाप्पाच्या डेकोरेशनची किंवा बाकी सगळी तयारी व्यवस्थित करतो, पण सकाळ संध्याकाळ लागणाऱ्या काही गोष्टी मात्र विसरतो आणि मग ऐनवेळी या गोष्टी करण्यात आपला बराच वेळ जातो. असे होऊ नये यासाठी लक्षात ठेवून बाप्पाला आवडणाऱ्या किंवा आपल्याला हाताशी लागतील अशा गोष्टी तयार ठेवाव्यात. म्हणजे ऐनवेळी पळापळ होणार नाही. पाहूयात या गोष्टी कोणत्या आणि त्यांची तयारी असेल तर आपला वेळ नक्कीच वाचू शकेल.
१. पंचखाद्य
पंचखाद्य ही बाप्पाला आवडणारी खिरापत. अचानक कोणी गणपतीचे दर्शन घ्यायला आले किंवा एखादवेळी आरतीनंतर प्रसादाला काही नसेल तर हे पंचखाद्य देता येते. हा पदार्थ कोरडा असल्याने आपण आधीपासूनच तो करुन ठेवू शकतो. किसलेले खोबरे, खारीक पावडर, खडीसाखर किंवा पिठीसाखर, किसमिस म्हणजेच बेदाणे आणि खसखस असे ५ ‘ख’ वापरुन ही खिरापत केली जाते. गणपतीच्या २ ते ३ दिवस आधीच आपण ही खिरापत करुन ठेवू शकतो.
२. आरतीसाठी फुलवात आणि तूपवात
आरतीसाठी निरांजनामध्ये किंवा समईमध्ये आपल्याला फुलवात लागते. ही वात व्यवस्थित वळलेली नसेल तर ती व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे वाती वळलेल्या आहेत की नाही ते पाहून त्या आधीच तेलात किंवा तुपात भिजवून ठेवाव्यात. म्हणजे ऐनवेळी वात लागत नाही म्हणून वेळ जात नाही. तसंच जास्तीचं तेल आणि तूप डब्यांमध्ये काढून ठेवावे म्हणजे आरती करताना चुकून तेल, तूप संपले तर वरुन घालता येते.
३. मोदकाची तयारी
गणपतीच्या पहिल्या दिवशी आपण साधारणपणे मोदक करतो. यामध्ये तळणीचे मोदक, उकडीचे, खव्याचे मोदक यांचा समावेश असतो. मोदकासाठी साधारणपणे ओल्या खोबऱ्याचे किंवा सुक्या खोबऱ्याचे सारण लागते. सुक्या खोबऱ्याचे साऱण असेल तर ते आधी १ किंवा २ दिवस बनवले तरी चालते. ओल्या खोबऱ्याचे असेल तर खोबरे खोवून ठेवणे किंवा मिक्सरवर बारीक करुन ठेवणे, गूळ किसून ठेवणे अशी प्राथमिक तयारी आपण आधीच करुन ठेवू शकतो. त्यामुळे ऐनवेळी स्वयंपाकाला लागणारा वेळ वाचतो.