Join us  

ऐन गणपतीत धावपळ होऊ नये म्हणून आधीच करुन ठेवा ३ गोष्टींची तयारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2023 4:41 PM

Ganpati Festival Preparation : नैवेद्यापासून ते गणपतीच्या आरतीच्या तयारीपर्यंत आणि पाहुण्यांपासून ते गौरीच्या सगळ्या गोष्टींपर्यंत महिलांना जास्त काम पडते.

गणपती येणार म्हणून सगळीकडे अतिशय आनंदाचे वातावरण असते. घरोघरी लहान मुलांपासून सगळ्यांचाच उत्साह ओसंडून वाहत असतो. एकीकडे खरेदी, गणपतीच्या डेकोरेशनची तयारी, बाप्पाच्या नैवेद्याला काय-काय असेल त्याचे प्लॅनिंग, आरतीला येणारे पाहुणे, भजनं अशा सगळ्या गोष्टींमुळे आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. गणपती येणार म्हटल्यावर खूप गोष्टींची तयारी करायची असते. यामध्ये घरातील सगळ्यांचीच काही प्रमाणात ओढाताण होण्याची शक्यता असते. बहुतांश वेळा महिलांना या सगळ्याचा जास्त प्रमाणात ताण येतो. कारण नैवेद्यापासून ते गणपतीच्या आरतीच्या तयारीपर्यंत आणि पाहुण्यांपासून ते गौरीच्या सगळ्या गोष्टींपर्यंत महिलांना जास्त काम पडते (Ganpati Festival Preparation). 

मात्र अशावेळी थोडी आधीपासून काही गोष्टींची तयारी असेल तर ऐनवेळीची गडबड होत नाही. बरेचदा गणपती आल्यावर लहानसहान गोष्टींमध्ये आपला बराच वेळ जातो आणि मग बाकीची कामं राहून जातात. याचा शारीरिक आणि मानसिक ताण यायला लागतो आणि मग खूप दमणूक होऊन आपण सणाचा म्हणावा तसा आनंद घेऊ शकत नाही. असे होऊ नये यासाठी लक्षात ठेवून बाप्पाला आवडणाऱ्या किंवा आपल्याला हाताशी लागतील अशा गोष्टी तयार ठेवाव्यात. म्हणजे ऐनवेळी पळापळ होणार नाही. पाहूयात या गोष्टी कोणत्या आणि त्यांची तयारी असेल तर आपला वेळ नक्कीच वाचू शकेल. 

(Image : Google)

१. नियोजन

बाप्पाच्या आरतीला दोन्ही वेळेस काय प्रसाद ठेवायचा याचे आधीपासूनच योग्य ते नियोजन असायला हवे. ऐनवेळी आरतीसाठी जास्तीचे लोक आले तर घरात तयार असेल अशी खिरापत, लाडू असे काही ना काही आधीपासून तयार ठेवायला हवे. ज्या ज्या दिवशी घरी जेवण आहेत त्यावेळी किती लोक येणार, मेन्यू काय असेल, त्यासाठी लागणारी बेसिक तयारी आधीपासून करुन ठेवायला हवी. म्हणजेच गूळ बारीक करुन ठेवणे, खोबरे खोवून किंवा किसून ठेवणे, दाण्याचा कूट तयार ठेवणे, सगळी पीठे तयार ठेवणे, पिठीसाखर, वेलची पूड यासारख्या गोष्टी आधीपासून तयार ठेवायला हव्यात. म्हणजे ऐनवेळी या कामांनी गोंधळ उडत नाही. 

२. आरतीच्या तयारीबाबतच्या गोष्टी 

आरतीसाठी निरांजनामध्ये किंवा समईमध्ये आपल्याला फुलवात लागते. ही वात व्यवस्थित वळलेली नसेल तर ती व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे वाती वळलेल्या आहेत की नाही ते पाहून त्या आधीच तेलात किंवा तुपात भिजवून ठेवाव्यात. म्हणजे ऐनवेळी वात लागत नाही म्हणून वेळ जात नाही. तसंच जास्तीचं तेल आणि तूप डब्यांमध्ये काढून ठेवावे म्हणजे आरती करताना चुकून तेल, तूप संपले तर वरुन घालता येते. कापूराची डबी, उदबत्ती, काडेपेट्या जास्तीच्या आणून हाताशी ठेवणे गरजेचे असते. निर्माल्यासाठी बाजूला एखादी पिशवी ठेवायला हवी जेणेकरुन बाप्पाच्या आजुबाजूला वाळलेल्या फुलांचा आणि हारांचा पसारा दिसत नाही. 

(Image : Google)

३.  बसण्याची व्यवस्था

आपल्या घरात असणारी जागा आणि येणारे पाहुणे यांचा आपल्याला नीट अंदाज असतो. मात्र तरीही घरात पसारा असेल किंवा योग्य पद्धतीचे नियोजन नसेल तर पाहुणे आल्यावर ऐनवेळी त्यांना बसायला किंवा उभे राहायला जागा मिळत नाही. यासाठी आधीपासूनच गणपती ज्या खोलीत बसणार आहे त्याठिकाणी व्यवस्थित जागा तयार करायला हवी. तसेच न लागणाऱ्या काही गोष्टी असतील तर त्या घराच्या बाहेर किंवा गॅलरीत ठेवायला हव्यात.

टॅग्स :सोशल व्हायरलगणपतीगणेशोत्सव