गणपती म्हणजे अनेकांसाठी आराध्यदैवत. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण गणपती बाप्पाला वंदन करतो. बाप्पाचा आशिर्वाद कायम आपल्या डोक्यावर असावा अशी भक्तांची इच्छा असते. त्यासाठी आपण मनोभावे त्याची पूजा करतो. एरवीही बाप्पाची आराधना करणारे आपण गणेशोत्सवात तर बाप्पाला अतिशय मनोभावे पूजतो. शक्तीच्या रुपात बाप्पा कायम आपल्यासोबत आहे असा विश्वास ठेवून आपण सगळी कामे करत राहतो. आपण एखाद्या व्यक्तीला नमस्कार करतो तेव्हा नकळत ती व्यक्ती उभी राहते आणि आपल्या डोक्यावर हात ठेवते. बाप्पानेही असाच पायाला हात लावून नमस्कार केल्यावर उभं राहून आपल्याला आशीर्वाद दिला तर? ऐकून कदाचित तुम्हाला हे नवल वाटू शकतं. पण अशाप्रकारचा बाप्पा सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे (Ganpati Festival Unique Ganesh Idol Viral Video).
आपण कमळात बसलेला, उंदरावरचा, गरुडावरचा किंवा अगदी एखाद्या यानात बसलेला गणपती बाप्पा पाहिला असेल. पण उभं राहून आशीर्वाद देणारा गणपती बाप्पा आपण नक्कीच पाहिला नसेल. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अद्याप समजले नसून गणेश चतुर्थीच्या १ दिवस आधीपासून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेटीझन्सनाही हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात आवडला असून वारंवार तो व्हिडिओ पाहण्याला लोक पसंती देत आहेत. व्हिडिओमध्ये सिंहासनावर बसलेली गणपतीची एक प्रतिमा आहे. एक व्यक्ती नमस्कार करताना गणपतीच्या पायांना स्पर्श करतो तर काही क्षणात हा गणपती बाप्पा उठून उभा राहतो आणि हाताने आशीर्वादही देतो.
Simple engineering technique that makes the idol so meaningful!
— Harsh Goenka (@hvgoenka) August 31, 2022
Happy Ganesh Chaturthi pic.twitter.com/rbvpnlTQLA
प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ते लिहीतात सोप्या इंजिनिअरींग टेक्निकमुळे मूर्ती किती अर्थपूर्ण झाली. १५ सेकंदांची ही क्लीप आतापर्यंत हजारो जणांनी पाहीली आहे. इन्स्टाग्राम, व्हॉटसअॅप अशा इतर माध्यमांवरही हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून बाप्पाचे भक्त ती मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर करत आहेत. इतकेच नाही तर अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. अशाप्रकारे बाप्पा आपल्याला स्वत: उठून आशीर्वाद देणार असेल तर आणखी काय हवे अशा पद्धतीच्या भावना नेटीझन्सनी व्यक्त केल्या आहेत.