गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या ४ दिवसांवर आलं असताना घरोघरी आता बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी सुरू झाली असेल. कोणी घरगुती वस्तूंचा वापर करुन तर कोणी बाजारात मिळणारे डेकोरेशन आणत आपल्या बाप्पाला आणि गौरींनी त्यात विराजमान करतात. हातात पुरेसा वेळ असेल आणि कुटुंबात मदतीचे हात असतील तर आपण काहीतरी क्रिएटीव्ह आणि छान नक्कीच करु शकतो. पण एकदा केलेले डेकोरेशन पुढचे ५ ते ६ दिवस किंवा १० दिवसांसाठी बाप्पा येणार असेल तर १० दिवस टिकावे यासाठी ते करताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. नाहीतर बाप्पा विराजमान झाल्यानंतर २ दिवसांतच डेकोरेशनमधील गोष्टी खाली पडायला लागतात नाहीतर काही ना काही अडचणी येऊन डेकोरेशन खराब व्हायला लागते. त्यामुळे डेकोरेशन करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी आणि कोणत्या चुका टाळायला हव्यात याविषयी (Gauri Ganpati Festival Decoration Tips Avoid 4 Mistakes)...
१. बॅकग्राऊंडला कागद किंवा कापड लावताना
गणपतीच्या मागच्या बाजूला आपण एखादे कापड किंवा कागद लावतो. ते लावताना घट्ट बांधा किंवा चिकटवा. नाहीतर २ दिवसांनी वाऱ्यामुळे किंवा कोणाचा धक्का लागल्याने ते लगेच खाली पडते आणि सगळ्या डेकोरेशनची पार वाट लागते. त्यामुळे कापडाचा किंवा कागदाचा प्रकार लक्षात घेऊन, आपल्या भिंतीचा किंवा मागे असलेल्या खिडकीचा, टाइल्सचा पॅटर्न लक्षात घेऊन त्यापद्धतीने बॅकग्राऊंड तयार करा.
२. डेकोरेशन चिकटवताना
अनेकदा आपण भिंतीला थर्माकोलच्या, पुठ्ठ्याच्या गोष्टी एकमेकांना चिकटवतो. काहीवेळा यामध्ये प्लास्टीक किंवा रबराचाही वापर केलेला असतो. या गोष्टी चिकटवताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे सेलोटेप, फेविकॉल यांचा वापर करतो. मात्र ते योग्य पद्धतीने चिकटतेच असे नाही. थोडा वेळाने आपण चिकटवलेल्या गोष्टी निघून यायला सुरुवात होते. अशावेळी आपण डेकोरेशनसाठी वापरत असलेले मटेरीयल आणि चिकटवण्यासाठी वापरत असलेली गोष्ट यांचा योग्य पद्धतीने विचार व्हायला हवा. सध्या बाजारात रबरी गोष्टी चिकटवण्यासाठी किंवा कापड चिकटवण्यासाठी बरेच वेगवेगळ्या प्रकारचे मटेरीयल मिळते, त्याचा शोध घ्या आणि मगच डेकोरेशन करा.
३. लायटींग करताना
गणपती आणि गौरीच्या डेकोरेशनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची लायटींग करतो. ती करताना अनेकदा आपल्याला तांत्रिक गोष्टींचा अंदाज नसतो. अशावेळी डेकोरेशन छान दिसावे हे जरी ठिक असले तरी ते करताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. नाहीतर इलेक्र्टीक विषयात काही घोळ झाला तर अपघात घडण्याची शक्यता असते.
४. दिवे लावताना
गणपती आणि गौरीसमोर आपण अनेकदा समई, निरांजन किंवा वेगवेगळ्या आकाराचे बाजारात मिळणारे दिवे लावतो. हे दिवे पारंपरिक आणि दिसायला अतिशय छान असतात खरे. पण ते लावताना ते कापडाच्या, लहान मुलांच्या जवळ येणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्यायला हवी. अन्यथा गौरी-गणपतीच्या दिवसांत दिव्यामुळे काही अघटीत घटना घडल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. बाप्पासमोर तेवता दिवा असला पाहिजे हे खरे असले तरी तो दिवा लावताना काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.