Join us  

दिवाळीला मित्रमंडळी-नातेवाईकांच्या घरी जाताना भेट म्हणून नेण्यासाठी ४ पर्याय; प्रेमाच्या भेटीने पाहुणेही होतील खूश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2022 4:11 PM

Gift Ideas For Diwali Festival While Going to Guest Home : खाऊच्या ऐवजी वेगळं आणि सगळ्यांना उपयोगी होईल असं काहीतरी भेट म्हणून नेलं तर तेही खूश होतात आणि आपल्यालाही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून बरं वाटतं.

ठळक मुद्देएखादा छानसा कपचा सेट गिफ्ट म्हणून दिल्यास घरातील सगळेच तो वापरु शकतात.  भिंतीवर लावायचे घड्याळ, की होल्डर, एखादा टेबल पीस अशा बऱ्याच गोष्टी आवडीनुसार आणि घराला सूट होतील त्यानुसार आपण देऊ शकतो.

दिवाळी म्हणजे वर्षातला मोठा सण. दिवाळीत अनेकांना आठवडाभराची सुट्टी असते. मग या सणाच्या निमित्ताने आपल्या नातेवाईकांना, जवळच्या मित्रमंडळींना भेटण्याचे बेत होतात. कधी फराळाला तर कधी जेवायच्या निमित्ताने आपण एकमेकांच्या घरी जातो. आता कोणाच्या घरी जाणार म्हटल्यावर आपण काही ना काही घेऊन जातोच. दिवाळीच्या दिवसांत फराळाचे पदार्थ आणि गोड खाऊन सगळेच कंटाळलेले असतात. तसंच या दिवसांत सगळ्यांकडेच भरपूर खाऊ असतो. अशावेळी खाऊच्या ऐवजी वेगळं आणि सगळ्यांना उपयोगी होईल असं काहीतरी भेट म्हणून नेलं तर तेही खूश होतात आणि आपल्यालाही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून बरं वाटतं. आता असं वेगळं म्हणजे नेमकं काय देता येईल असे पर्याय पाहूया (Gift Ideas For Diwali Festival While Going to Guest Home)...

(Image : Google)

१. रोप 

आपण ज्यांच्याकडे जात आहोत त्यांच्याकडे घराला गॅलरी असेल तर एखादं छानशा फुलाचं किंवा शोभेचं रोप आपण नक्की गिफ्ट म्हणून घेऊन जाऊ शकतो. त्यांच्या घराला गॅलरी नसेल आणि रोप ठेवण्यासाठी जागा नसतील तर हल्ली बरीच इनडोअर प्लांटसही मिळतात. ही भेट एकतर कायम सोबत राहणारी आहे. तसंच रोपाला येणारी फुलं आणि त्यामुळे घरात निर्माण होणारी प्रसन्नता नक्कीच दिवाळीचा सण आणखी स्पेशल करु शकेल. 

२. कँडल 

सध्या बाजारात वेगवेगळ्या आकाराच्या, रंगांच्या आणि सुगंध येणाऱ्या अशा कँडल मिळतात. या कँडल्स दिसतातही खूप छान आणि त्यातून येणारा सुगंध दिर्घकाळ राहणारा असल्याने अशा कँडल्स आपण गिफ्ट म्हणून नक्की देऊ शकतो. घरात या कँडल लावल्यावर वाटणारी प्रसन्नता घरातील सगळ्यांनाच सुखावणारी असू शकते. 

(Image : Google)

३. शो पीस किंवा की स्टँड 

आपण ज्यांच्या घरी जाणार आहोत त्यांची साधारण आवड आपल्याला माहित असते. त्यांच्या आवडीनुसार किंवा त्यांच्या घराच्या रचनेनुसार एखादं वॉल हँगिंग किंवा लहानसं शो पीस आपण नक्की खरेदी करु शकतो. त्यामुळे त्यांच्या घराची शोभा तर वाढतेच पण हे शो पीस लावल्याने आपण त्यांच्या कायम लक्षात राहतो. यामध्ये भिंतीवर लावायचे घड्याळ, की होल्डर, एखादा टेबल पीस अशा बऱ्याच गोष्टी असू शकतात.

४. कप सेट 

ही तर घरात सतत लागणारी गोष्ट असते. सध्या बाजारात विविध रंगांचे, आकारांचे आणि ब्रँडचे कप सेट मिळतात. कप काचेचे असल्याने फुटतात आणि दर काही काळाने कपचा सेट खरेदी करण्याची वेळ आपल्यावर येते. त्यामुळे एखादा छानसा कपचा सेट गिफ्ट म्हणून दिल्यास घरातील सगळेच तो वापरु शकतात.  

टॅग्स :सोशल व्हायरलदिवाळी 2022गिफ्ट आयडिया