पालक कायम आपल्या फायद्याचेच सांगत असतात. मात्र आपल्याला त्यांच्या सूचना पटत नाहीत आणि आपण त्यांना उलटे बोलतो किंवा त्यांचे ऐकत नाही. असे करणे आपल्यासाठी तोट्याचे असते हे लक्षात घ्यायला हवे. याचे महत्त्व वेळीच आपल्याला समजत नाही आणि नंतर त्याबाबत पश्चाताप करुन काहीही उपयोग नसतो. मोबाइल हा तर सध्या सगळ्यांच्याच हातातील ताईत झाला आहे. हा मोबाइल हातात नसेल तर आपल्याला अगदीच चुकल्याचुकल्यासारखे होते. अगदी लहान मुलांपासून तेवयस्कर मंडळींपर्यंत सगळ्यांच्याच हातात २४ तास मोबाइल असतो. मोबाइल कमीत कमी वापरावा यासाठी पालक वारंवार सूचना देत असतात (Girl Jumps Into Chitrakote Waterfall Chhattisgarh after Parents Scold her for using mobile phone) .
अशाच प्रकारच्या सूचना सरस्वती मौर्य या १८ वर्षाच्या मुलीला आई वडीलांनी तिला दिल्या. या सांगण्याचा राग आल्याने तिने थेट आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्या करण्यासाठी ही तरुणी छत्तीसगडमधील चित्रकोट धबधब्यावर गेली आणि कसलाही विचार न करता तिने धबधब्यावरुन उडी मारली. सध्या पावसाळा असल्याने या धबधब्याला मोठ्या प्रमाणात पाणी होते. ही तरुणी उडी मारत असताना अनेकांनी पाहिले आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने कोणाचेच न ऐकता पाण्यात उडी घेतली. पाण्यात पडल्यानंतर आपण बुडायला लागलो हे लक्षात आल्यावर तिने पोहण्याचा प्रयत्न केला आणि स्वत:चा जीव वाचवण्यासाठी अकांत करायला लागली.
या धबधब्यावर सुरक्षेसाठी तैनात असलेली टीम तिला वाचवण्यासाठी नाव घेऊन गेले आणि तिचा जीव त्यांनी वाचवला असे पोलिसांनी सांगितले. ही तरुणी याच गावात राहणारी असून ती याठिकाणी एका हॉटेलमध्ये काम करते. या घटनेचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला असून तो सोशल मीडियावर अपलोडही करण्यात आला आहे. या पाण्याचा प्रवाह किती जोरदार आहे हे या व्हिडिओमधून दिसते. मागीलवर्षी अशाचप्रकारे एका तरुणीने या धबधब्यात उडी मारली होती. आई वडीलांच्या सांगण्याचा इतका राग यावा आणि त्यामुळे तरुण वयात असे पाऊल उचलावे याबाबत सोशल मीडियात खेद व्यक्त होत आहे.