गूगल हे जगातील सर्वात जास्त बघितले जाणारे मुखपृष्ठ आहे. त्यावर डूडल (Google Doodle) हे असे साधन आहे ज्याद्वारे जागतिक समस्या, ऐतिहासिक घटना आणि जगभरातील उत्सव हायलाइट करण्यासाठी वापरले जाते. सर्च बॉक्सच्या वर आपल्याला गुगलचा लोगो दिसत असतो. मात्र, काहीतरी विशेष असेल त्यादिवशी त्यामध्ये कोणाचा फोटो, काही डिझाईन असलेला लोगो आपल्याला दिसतो. त्यालाच आपण 'डूडल' (Google Doodle) म्हणतो. आपण त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याबद्दल माहिती मिळत असते. आपल्याला नवनवीन गोष्टींबद्दल माहिती मिळावी, हाच गुगलचा डूडल (Google Doodle) तयार करण्याचा उद्देश आहे.
भारत देश आज ७७ व्या स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहे. या दिवसाचे औचित्य साधून गुगलने खास डूडल (Doodle) बनवले आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत देश ब्रिटीश राजवटीतून मुक्त झाला. आजचे डूडल भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधते आणि नवी दिल्लीस्थित अतिथी कलाकार नम्रता कुमार यांनी चित्रित केले आहे. १९४७ मध्ये या दिवशी ब्रिटीश राजवटीतून भारत स्वतंत्र झाल्यामुळे एका नवीन युगाची सुरुवात झाली. गुगलने पारंपारिक कापडासोबत खास डूडल आर्ट बनविले आहे(Google Doodle Celebrates India's Independence Day By Showcasing Its Various Extraordinary Textile Traditions).
स्वातंत्र्य दिनी विशेष दिसणाऱ्या या डुडल आर्टमध्ये नेमकं आहे तरी काय ?
१. खादी :- भारतीय खादी हे हाताने विणलेले नैसर्गिक फायबर फॅब्रिक आहे. इंग्रजांच्या काळात याला 'खद्दर' असेही म्हटले जात असे. खादी या कापडाला स्वदेशी कापड देखील म्हटले जाते. खादी कापड बनवण्यासाठी कापसाचे तंतू चरख्यावर ठेवून सूत काततात. या फॅब्रिकचे वैशिष्ट्य म्हणजे ते उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार असते.
२. कलमकारी, आंध्र प्रदेश :- कलमकारी हे कापड मुद्रणाचे पारंपारिक भारतीय तंत्र आहे, ज्यामध्ये नैसर्गिक रंगांचा वापर करून कापडांवर हाताने पेंटिंग किंवा ब्लॉक प्रिंटिंग डिझाइनचा समावेश आहे. "कलमकारी" हा शब्द दोन पर्शियन शब्दांपासून बनला आहे, "कलाम" म्हणजे पेन आणि "कारी" म्हणजे कारागिरी. याचा उगम भारतातील आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या प्राचीन प्रदेशात झाला असे मानले जाते.
३. बनारसी सिल्क, वाराणसी, उत्तर प्रदेश :- बनारसी सिल्क त्याच्या सोने आणि चांदीच्या ब्रोकेड किंवा जरी तसेच उत्तम रेशीम आणि भव्य भरतकामासाठी ओळखले जाते. बनारसी सिल्कपासून बनवलेल्या साड्यांना जगात पसंती आहे.
४. चिकनकारी, लखनौ, उत्तर प्रदेश :- चिकनकारी ही एक पारंपारिक भरतकाम शैली आहे जी भारतातील लखनौ शहरात उगम पावली आहे. बारीक मलमलच्या कापडावर नाजूक पांढऱ्या धाग्याच्या कामासाठी हे प्रसिद्ध आहे. १६ व्या शतकात मुघल काळात भारतात चिकनकारीचा उगम झाला असे मानले जाते.
५. चंदेरी, मध्य प्रदेश :- चंदेरी फॅब्रिक हे एक बारीक, हलके आणि अर्धपारदर्शक कापड आहे जे भारतातील मध्य प्रदेशातील चंदेरी शहरात हाताने विणले जाते. हे रेशीम आणि कापसाच्या मिश्रणातून बनवले जाते, ज्यामुळे ते एक सुंदर फॅब्रिक बनते. चंदेरी फॅब्रिक्स त्यांच्या गुंतागुंतीच्या आणि सुंदर डिझाईन्ससाठी ओळखले जातात.
६. पश्मिना, काश्मीर :- पश्मिना हे क्रिम रंगाच्या शेळीच्या लोकरीपासून बनवलेले अत्यंत मऊ आणि बारीक कापड असेल. काश्मिरी भाषेत पश्मिना म्हणजे मऊ सोने. एक पश्मीना शाल बनवायला एक आठवडा लागतो. शालीवर भरतकाम हाताने केले जाते, ज्यामुळे ते तयार करण्यास अधिक वेळ लागतो.
७. फुलकरी, पंजाब :- फुलकरीचा अर्थ 'फुलांचे काम' असा होतो. हे कापड तयार करण्यासाठी सुई, रेशमी धागा आणि उच्च दर्जाचे कौशल्य वापरले जाते. या प्रकारच्या कलेमध्ये सामान्यतः फुले, पानांची रचना केली जाते. हे फॅब्रिक सहसा भरतकामाने बनवले जाते आणि विविध रंग आणि डिझाइनमध्ये उपलब्ध असते. साडी, दुपट्टे, शाल आणि इतर कपडे बनवण्यासाठी फुलकरीचा वापर केला जातो.
८. कांजीवरम, तामिळनाडू :- कांजीवरम हे शुद्ध तुतीच्या रेशमापासून विणले जाते. हे एक प्रकारचे रेशीम आहे, जे भारतातील तामिळनाडू राज्यातील कांजीवरम शहरातबनवले जाते. चमकदार रंग, सुरेख पोत आणि सुंदर डिझाइनमुळे हे भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि महागडे रेशीम मानले जाते.
९. इकत, हैदराबाद :- इकत फॅब्रिक रेशीम, कापूस आणि लोकर यासह विविध प्रकारच्या तंतूपासून बनवता येते. हे कापड त्याचे आकर्षक रंग आणि सुंदर नमुन्यांसाठी ओळखले जाते. इकत फॅब्रिकचा उगम भारतात झाला असे मानले जाते आणि आजही त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते.
१०. बागरू प्रिंट, गुजरात :- बागरू प्रिंट हे नैसर्गिक रंगांपासून बनवलेले एक पारंपारिक मुद्रण तंत्र आहे. साडी, कुर्ता आणि इतर पारंपारिक भारतीय कपडे बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. हे तंत्र पर्शियातील विणकरांनी गुजरातमध्ये आणले होते, जे गुजरातमध्ये पटकन लोकप्रिय झाले आणि आता जगभरातील सर्वात प्रसिद्ध आणि अनन्य भारतीय फॅब्रिक प्रिंटपैकी एक आहे.