लग्नात नवरा-नवरी काय करतील काही सांगता येत नाही. कधी वरमाला घालण्याआधी गालावर किस करायला लावणारा नवरा तर कधी खिडकीतून नवऱ्याची वरात बघून तिथेच गाण्याच्या ठेक्यावर ताल धरणारी नवरी, इतकेच काय पण स्वत:च्याच लग्नात थकल्यामुळे ऐन विधींच्या वेळी डुलक्या काढणारी नवरी आणि आपल्या लग्नात पाणीपुरीवर ताव मारणारी नववधू अशा एकाहून एक गोष्टी सध्या आपण सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहतो. यात भर घालणारा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला आहे. यामध्ये नवरा चक्क नवरीच्या ताटातील पदार्थ तिचे लक्ष नसताना चोरुन आपल्या ताटात घेतो आणि त्यानंतर त्या दोघांचे प्रेमाने चालू असणारे भांडण या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते.
विमोना इव्हेंटस या इव्हेंट कंपनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला असून नवरा बायको आपल्या लग्नाच्या पंगतीत जेवायला बसल्याचे दिसत आहेत. नवरी मुलगी जेवताना तिच्या बाजूला असलेल्या कोणाशी बोलण्यात दंग आहे. तर तिचे लक्ष नसल्याचे पाहात नवरा तिच्या ताटातला पापड आपल्या ताटात घेतो आणि खायला सुरुवात करतो. तेवढ्यात या नवरीचे लक्ष जाते आणि आपल्या ताटात पापड नसल्याचे तिला लक्षात येते. आपल्या नवऱ्याच्या ताटात हात घालून ती आपला पापड परत घेते.
एकीकडे लग्नात एकमेकांना घास भरवत उखाणे घेण्याची पद्धत असताना दुसरीकडे या नवराबायकोचे हे हटके नखरे पाहून आपणही चकीत होतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर अनेकांनी हा व्हिडिओ लाइक करत त्यावर कमेंटसही केल्या आहेत. या प्रेमळ भांडणाचा व्हिडिओ नेटीझन्सना खूप आवडला असून त्यांनी त्याला हार्टचे आणि प्रेमाचे स्मायली पाठवत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकीने तर आपल्या होणाऱ्या पतीला टॅग करत तू असं माझ्या ताटातलं चोरु नकोस असंही म्हटलं आहे. या कपलच्या कपड्यांवरुन आणि ते केळीच्या पानावर जेवत असल्याने ते दक्षिण भारतीय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल आणि नेटीझन्सन त्याचा कसा आनंद लुटतील सांगता येत नाही.