लग्नाचा दिवस म्हणजे नवरी मुलीसाठी एकदम हेकटीक दिवस असतो. सतत वेगवेगळे कपडे आणि मेकअप, आपुलकीने भेटायला येणारे, चौकशी करणारे लोक, लग्नाचे विधी, कदाचित वेगवेगळ्या ताणांमुळे होणारी अपुरी झोप आणि नवीन आयुष्याचं, नवीन घरी जाण्याचे, आपले घर सोडण्याचे टेन्शन. यामुळे नवरी मुलगी पुरती बावरुन गेलेली असते. त्यातच घरातील ज्येष्ठ मंडळी सतत काही ना काही सुचना देत असतात. पण या इतक्या सगळ्या गडबडीतही एक नवरी मॅगीवर ताव मारत असल्याचा व्हिडियो नुकताच व्हायरल झाला आहे.
आवरुन विधींसाठी तयार होताना ही नवरी मात्र मस्त मॅगी खात असल्याचे व्हिडियोमध्ये दिसत आहे. तिच्यासोबत असलेली एक महिला याचे शूटींग करत आहे. ही महिला तिला लवकर आवर उशीर होतोय आणि वरात येईल असे सांगतीये. तर ‘दुल्हा वेट करेगा’ असं म्हणत ही नवरी मुलगी मॅगीवर ताव मारताना दिसतीये. ‘किती वेळ वाट पाहणार’, असे म्हटल्यावर ही नवरी गमतीने अर्धा-एक तास असे म्हणते. यावेळी एकीकडे तिची हेअरस्टाइल सुरू आहे तर दुसरीकडे तिचा मेकअप सुरू असल्याचे दिसत आहे. ‘द शादी स्वॅग’ या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडियो पोस्ट करण्यात आला आहे.
दुल्हा वेट करेगा अशीच कॅप्शन देत आपल्या माहितीतील फूडी ब्राइडला टॅग करा असेही या व्हिडियोच्या कॅप्शनमध्ये म्हणण्यात आले आहे. अनेकांनी आपल्या फूडी मैत्रीणींना टॅग केले आहे तर या व्हिडियोला इन्स्टाग्रामवर ३० हजारांहून जास्त लाइक्सही मिळाले आहेत. बऱ्याच तरुणींनी या व्हिडियोवर ‘भविष्यातली मी’ अशी कमेंट केली आहे. त्यामुळे खाण्यावर आणि मॅगीवर प्रेम असणाऱ्या मुलींची संख्या बरीच आहे असे आपल्याला म्हणता येईल. हा व्हिडियो सोशल मीडियात व्हायरल होत असून त्यावर बरेच जोकही केले जात आहेत. मॅगी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना कोणत्याही वेळेला आवडू शकते. या नवरीला मॅगीने अशाप्रकारे दिलेली साथ एकदमच हटके आहे.