Join us  

Gudhi Padwa 2022 : गुढीला घालतो ती साखरेची सुंदर गाठी कशी तयार करतात? पाहा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 1:57 PM

Gudhi Padwa 2022 :वेगवेगळ्या रंगात, आकारात आणि डिझाइन्समध्ये मिळणारी ही गाठी नेमकी कशी तयार केली जाते असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडत असेल.

ठळक मुद्देमोठ्या प्रमाणात गाठी बनवणाऱ्यांकडे काय पद्धत वापली जाते हे पाहूया. पाकामध्ये आपण आपल्याला आवडतात ते खायचे रंग घालू शकतो. 

गुढी पाडवा (Gudhi Padwa 2022) म्हटला की आपल्याला सगळ्यांना ज्याप्रमाणे श्रीखंड आवडते, त्याचप्रमाणे आवर्जून आठवतो तो आणखी एक गोड पदार्थ म्हणजे गाठी. साखरेपासून तयार केली जाणाऱ्या गाठीला धार्मिक महत्त्व आहे तसे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. उन्हाळा बाधू नय़े आणि कडक उन्हातही शरीराला थकवा वाटू नये यासाठी साखरेचे म्हणजेच गाठीचे पाणी प्यायची पद्धत आहे. लहान मुलांना अजूनही हे गाठीचे पाणी आवर्जून प्यायला दिले जाते. बाहेरच्या वातावरणात असणारा उकाडा बाधू नये हाच त्यामागील हेतू असतो. आता ही गाठी आपण बाजारातून विकत आणतो खरी. पण वेगवेगळ्या रंगात, आकारात आणि डिझाइन्समध्ये मिळणारी ही गाठी नेमकी कशी तयार केली जाते असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडत असेल. 

(Image : Google)

पूर्वीच्या काळी गाठी घरात तयार केल्या जायच्या आणि मग त्या दोऱ्यात एकमेकाला ओवल्या जायच्या पण आता तितका वेळ नसल्याने सगळे रेडीमेड आणण्यालाच प्राधान्य दिले जाते. मात्र साखरेच्या पाकापासून तयार केली जाणारी ही गाठी घरीही अगदी झटपट तयार करता येते. मागच्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी गाठी घरात करायचा प्रयत्नही केला. गुढीसाठी आणि लहान मुलांसाठी घरोघरी आवर्जून खरेदी  केली जाणारी ही गाठी कशी तयार होते हे पाहणे अगदीच इंटरेस्टींग आहे. मोठ्या प्रमाणात गाठी बनवणाऱ्यांकडे काय पद्धत वापली जाते हे पाहूया. सध्या सोशल मीडियामुळे घरबसल्या एका क्लिकवर आपण जगातील अनेक गोष्टी अगदी सहज पाहू शकत असल्याने जग जवळ आले आहे. त्याचप्रमाणे गाठी तयार करण्याचा हा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

बॉम्बे फूडी टेल्स यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. देशात वेगवेगळ्या ठिकाणी तयार केल्या जाणाऱ्या पारंपरिक पदार्थांपासून ते रस्त्यावर मिळणाऱ्या एखाद्या भन्नाट पदार्थांपर्यंत अनेक पदार्थ या पेजच्या माध्यमातून केला जातो. ५२ हजारांहून अधिक फॉलोअर्स असणाऱ्या या पेजवरील हा गाठी बनवण्याचा व्हिडिओ तुम्हीही नक्की पाहा आणि अशी पद्धत वापरुन तुम्हालाही गाठी तयार करता आल्या तर प्रयत्न करा. यामध्ये लाकडी साच्यामध्ये साखरेचा पांढरा आणि केशरी रंगाचा पाक घालून त्याची गाठी बनवण्यात येत असल्याचे दिसत आहे. या साच्यांमध्ये आधीच एक दोरी लावून ठेवल्याने त्यावर हा पाक टाकला की काही वेळात तो घट्ट होत असून तो पूर्णपणे वाळल्यानंतर हा साचा उघडून गाठी बाहेर काढली जात आहे. आपणही घरी एका रेषेत काही वाट्या घेऊन त्यात एक दोरी लावून त्या वाट्यांमध्ये पाक टाकला आणि थंड झाल्यानंतर ही दोरी उचलली तर त्याची गाठी आपल्याला मिळेल. या पाकामध्ये आपण आपल्याला आवडतात ते खायचे रंग घालू शकतो.  

 

टॅग्स :सोशल व्हायरलगुढीपाडवापाककृती