Join us  

कमाल! सांगा, १ मिनिटांत डोक्यानं २७३ अक्रोड कोण फोडतं? भाऊंनी केले भलतेच वर्ल्ड रेकार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2023 12:17 PM

Guinness World Records Indian Naveen Kumar Cracks 273 Walnuts with Head in 1 Minute: काय करतील तेवढं थोडंच

गिनिज बुकमध्ये रेकॉर्ड करण्यासाठी कोण काय करेल सांगता येत नाही. विविध प्रकारच्या कला सादर करत किंवा साहस करत अनेक जण विक्रम करतात आणि मग गिनिज बुक त्यांची नोंद घेते. नुकताच एका व्यक्तीने असाच एक रेकॉर्ड ब्रेक केला आहे. डोक्याने अक्रोड फोडण्याचा रेकॉर्ड त्याने ब्रेक केला असून अवघ्या एका मिनीटांत त्याने २७३ अक्रोड डोक्याने फोडले आहेत. हा तरुण फक्त २७ वर्षांचा असून त्याचे नाव नवीन कुमार असे आहे. नवीन कुमार हा मार्शल आर्टिस्ट असून त्याच्या या रेकॉर्डची नोंद गिनिज बुकमध्ये घेण्यात आली आहे. याआधी मुहम्मद रशिद यांनी २५४ अक्रोड एकावेळी फोडत रेकॉर्ड केला होता तो रेकॉर्ड नवीन कुमार याने मोडला आहे (Guinness World Records Indian Naveen Kumar Cracks 273 Walnuts with Head) . 

या दोघांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अशाप्रकारे डोक्याने कमीत कमी वेळात अक्रोड तोडण्यासाठी चुरस रंगली आहे. रशिद यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा डोक्याने १५० अक्रोड तोडत रेकॉर्ड केला होता. त्यानंतर त्यांनीच २०१६ मध्ये आपला हा रेकॉर्ड मोडत १८१ अक्रोड तोडले होते. २०१७ मध्ये नवीन कुमार याने २१७ अक्रोड तोडत रशिद यांचा रेकॉर्ड ब्रेक केला. त्यानंतर या दोघांनी इटलीमध्ये पुन्हा नव्याने रेकॉर्ड केले. त्यात नवीनने २३९ तर रशिद यांनी २५४ अक्रोड डोक्याने फोडले होते. आता तब्बल ५ वर्षांनंतर नवीन कुमार हा जगातील सर्वात महान नट क्रॅकरचा पुरस्कार जिंकला आहे. 

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून यामध्ये नवीन कुमार अतिशय शिताफीने अक्रोड फोडताना दिसत आहे. टेबलवर मांडून ठेवलेले अक्रोड काही क्षणात तो फोडतो. अक्रोडाचे कवच किती जाड असते आपल्या सगळ्यांनाच माहित आहे त्यामुळे इतक्या कमी कालावधीत डोक्याने म्हणजेच कपाळाने हे अक्रोड फोडणे ही खरंच कौतुकास्पद बाब आहे यात शंकाच नाही. १ मिनीटांत २७३ म्हणजेच एका सेकंदाला त्याने ४.५ अक्रोड फोडले आहेत.   

टॅग्स :सोशल व्हायरलगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड