मुलगी म्हणजे कुटुंबाची शान असते, याच मुलीचा सन्मान आणि कौतुक करण्यासाठी सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार देशभरात साजरा केला जातो. मुलींचे कुटुंबासाठी आणि समाजासाठी असणारे योगदान, लिंग समानता आणि मुली आणि त्यांच्या पालकांमधील बंध दृढ व्हावा यासाठी हा खास दिवस साजरा करण्यात येतो. महिला आणि मुलींसमोर असणारी आव्हाने आणि मुलामुलींमध्ये केला जाणारा भेदभाव याबाबत जनजागृती करण्याचा या दिवसाचा उद्देश आहे. केवळ आनंद साजरा करण्यासाठी नाही तर मुलींनी त्यांचे पंख पसरुन आपल्याला हवे तिथे विहार करावा, त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करता यावीत आणि समाजात आपले असे स्थान निर्माण करता यावे यासाठी हा दिवस साजरा केला जातो (Happy Daughters Day Celebration and Importance).
मुलगी ही आधी कोणाची तरी मुलगी, कोणाची बहिण, मग मैत्रीण, प्रेयसी, सहचारी, आई अशा विविध भूमिका बजावत असताना अनेक पातळ्यांवर लढत असते. तिच्यातील क्षमता आणि गुणांचा आपल्याला वेळोवेळी प्रत्यय येतच असतो. याच तिच्या मुलगीपणाचे सेलिब्रेशन करण्याच्या उद्देशाने हा रविवार साजरा केला जातो. ज्यांना मुलगा असतो ते आनंदी असतात पण ज्यांना मुलगी असते ते नशीबवान असतात असे म्हटले जाते. हे खरे आहे कारण मुली खऱ्या अर्थाने उत्साहाचा, आनंदाचा झरा असतात हे ज्यांना मुली आहेत ते नक्कीच सांगू शकतील.
या दिवशी आईवडील आपल्या मुलींना सरप्राईज भेटवस्तू, डीनर डेट असे काही ना काही प्लॅन करतात. मुलगी जास्त आनंदात राहावी हाच त्यामागचा मुख्य उद्देश असतो. त्यामुळे तुम्हीही तुमच्या मुलीसाठी हा दिवस खास व्हावा यासाठी काही प्लॅनिंग करत असाल तर एखादी छोटीशी लाँग ड्राईव्ह, डीनर डेट प्लॅन करु शकता. तसेच तुमच्या मुलीच्या आवडीनुसार तिला छान भेटवस्तूही देऊ शकता. मुली आहेत म्हणून नवनिर्मिती होऊ शकते, मुली आहेत म्हणून आयुष्यात काळजी घेणारे आणि आनंदाने सगळ्यांसाठी सतत झटणारे हात आहेत, मुली आहेत म्हणून आयुष्य सुकर आहे हे नाकारुन चालणार नाही.