जगभरात मोठ्या उत्साहात २०२२ या वर्षाला निरोप देऊन २०२३ या वर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत लोक हा क्षण मोठ्या उत्साहात सेलिब्रेट करताना दिसतात. जगभरात बहुतांश ठिकाणी नवीन वर्षाचे स्वागत करताना आतषबाजी करण्यात येते. पण केवळ पृथ्वीवरच नाही तर अंतराळातही नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यात आले.
आता ज्याठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्ती शून्य असते तिथे सेलिब्रेशन कसे झाले असेल असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडू शकतो. पण याठिकाणीही नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले असून या सेलिब्रेशनचा व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झाला आहे.रशियाच्या अंतराळवीरांनी अंतराळयानात हे सेलिब्रेशन केले आहे. सर्गेई प्रोकोपिएव, एना किकिना और दिमित्री पेटेलिन या तीन अंतराळवीरांनी हे सेलिब्रेशन केले. यासाठी त्यांनी आपले अंतराळयान अतिशय छान पद्धतीने सजवले असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते.
हे तिघे आता Soyuz MS-22 या मिशनवर असून अंतराळयानात सगळ्या गोष्टी कशाप्रकारे तरंगतात हे दिसते. या व्हिडिओमध्ये हे अंतराळवीर स्वत:ही गोल फिरुन दाखवतात. तर त्यांच्या हातात असलेल्या शोभेच्या वस्तूही हवेत तरंगत असल्याचे दिसते. रशियान एजन्सी रोस्कोसमोसने हा व्हिडिओ रिलिज केला असून शांघाय आय या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या ५० सेकंदांच्या या व्हिडिओमधून आपल्याला याठिकाणी काय परिस्थिती असते याचा अंदाज येतो. व्हिडिओच्या शेवटी हे अंतराळवीर थेट अवकाशातून सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात.