आपल्या चिमुकल्या बाळाला डे केअर मध्ये सोडून कामाला जावं लागत असलेल्या आईला (working women) काय वाटत असतं, हे केवळ ती आई आणि तिच्यासारखा अनुभव घेतलेल्या इतर Working Mother च समजू शकतात. एखाद्या वेळी बाळ आजारी असेल किंवा त्याला आईला साेडून डे केअर (day care) मध्ये राहण्याची अजिबातच इच्छा नसेल तर त्यावेळी हाेणारी त्या आईच्या मनाची घालमेल तर विचारायलाच नको..
म्हणूनच आजकाल आई आणि बाळ दोघांनाही एकमेकांजवळ राहता यावं, यासाठी अनेक कंपन्यांनी त्यांची स्वत:ची डे केअर सेंटर्स सुरू केली आहेत. आईच्या ऑफिसच्या आवारातच हे डे केअर असल्याने आई जेव्हा पाहिजे तेव्हा जाऊन बाळाची चौकशी करू शकते, त्याच्यासोबत वेळ घालवू शकते. पण आता मात्र त्याच्याही पुढचा विचार केला जात आहे. आणि नेमकी तिच गोष्टी उद्योगपती हर्ष गोयंका यांनी एक ट्वीट शेअर करून सांगितली आहे.
''This special desk was created for a working mother'' अशी कॅप्शन देऊन त्यांनी हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये असं दिसत आहे की एक आई ऑफिस डेस्कवर बसून कम्प्युटरवर काम करत आहे. तिच्या बाजूला आणखी एक कम्पार्टमेंट आहे. ते सगळीकडून पॅक आहे आणि त्यामध्ये तिचं बाळ खेळत आहे. तिथे बाळासाठी काही खेळणी आणि पुस्तकेही ठेवण्यात आली आहेत. सोशल मिडियावर या फोटोची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. हा फोटो नेमका कुठला हे काही गोयंका यांनी सांगितलेलं नाही. पण ते ऑफिस नसून ती अमेरिकेतली एक लायब्ररी आहे, असे रिप्लाय त्यांना काही जणांनी केले आहेत. काही जणांना अशा पद्धतीचं ऑफिस अतिशय आवडलं असून काही जणांच्या मते यापेक्षा वर्क फ्रॉम होम बरं..
मतप्रवाह वेगवेगळे असले तरी बाळ सांभाळणं ही फक्त आईचीच जबाबदारी नाही, त्यासाठी तिनं करिअरवर पाणी सोडावं असंही नाही.त्यापेक्षा असे काही पर्याय आणि प्रयत्न यांचं कौतुक व्हायला हवं आणि केवळ कौतुकच नाही तर बाळ लहान असताना आईला मदत-सहकार्य करणंही गरजेचं, तसं करणं म्हणजे आपण काही खास करतो असं वाटून न घेता, आईसह बाळ आणि समाजासाठी ते महत्त्वाचं आहे.