रोजचे जेवण बनवण्यासाठी वेगवेगळे प्रकारची भांडी वापरली जातात. प्रत्येकाच्या घरात नॉन स्टिक तव्याचा वापर होतो. नॉन स्टिक तव्यावर आपण चपाती, डोसे, धिरडे एखादा झटपट होणारा प्रकार त्यावर तयार करतो. परंतु, हे महागडे तवे काही दिवसानंतर लगेच खराब होतात. त्याचा वापर वारंवार केल्यानंतर तव्याच्या बाजूने थर जमा होण्यास सुरुवात होते. इतकेच नाही तर काही दिवसांतच तव्याचे कोटींग निघायला सुरुवात होते. ज्यामुळे तवा खडबडीत होतो.
अशा परिस्थितीत पदार्थ योग्यप्रकारे तयार होत नाही. नॉन स्टीक पॅन आहे तसा चांगला राहावा यासाठी काय करायचं याविषयी काही सोप्या टिप्स समजून घेणे महत्त्वाचे आहे. बेसिक नॉन स्टिक तवा साफ करण्याची योग्य पद्धत आपल्या तव्याला दीर्घकाळापर्यंत चांगले ठेवेल.
नॉन स्टिक तवा साफ करण्यासाठी साहित्य
पाणी
व्हिनेगर
लिक्विड डिश वॉश सोप
फॉइल पेपर
बेकिंग सोडा
लाकडी स्पॅटुला किंवा चमचा
नॉन स्टिक तव्याला करा असे साफ
सर्वप्रथम, तवा पाण्याने धुवा. धुतल्यानंतर तवा गॅसवर ठेवा. त्यात पाणी टाका. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस कमी करा. त्यात व्हिनेगर, बेकिंग सोडा, लिक्विड सोप घालून चमच्याने ढवळत राहा. आता त्यात फॉइल पेपरचा बॉल टाका आणि झाकून ठेवा. ५ मिनिटे उकळल्यानंतर गॅस बंद करा. आता जळलेले भांडे सिंकमध्ये ठेवा आणि चमच्याच्या मदतीने पृष्ठभागावर चिकटलेले पदार्थ काढा.
अशा प्रकारे तव्याच्या कोपऱ्यात जमलेले थर आणि तेलकटपणा निघून जाईल. पुन्हा सामान्य पाण्याने तवा धुवून घ्या. टिश्यू अथवा सुती कपड्याने पुसून तवा रॅकमध्ये ठेवा. या पद्धतीमुळे तवा नव्यासारखा दिसेल.