पावसाळा आणि वडापाव किंवा भजी यांचे एक अनोखं नातं आहे. बाहेर धुवाधार पाऊस, अंगात भरलेली हुडहुडी आणि त्यासोबत गरम चहा आणि वडापाव. या कॉम्बिनेशनला काही तोडच नाही. भारतात स्ट्रीट फूडपैकी एक महत्त्वाचा पदार्थ असलेला वडापाव कोणत्याही वेळेला कुठेही मिळणारा पदार्थ आहे. पोटभरीचा, स्वस्तात मस्त आणि चविष्ट वडापाव न आवडणारा व्यक्ती निराळाच. कधी नाश्त्याला, कधी संध्याकाळच्या चहासोबत तर काही वेळा जेवण म्हणूनही वडापाव खाणारे लोक आपल्या आजुबाजूला असतात. भारतातील बहुतांशा राज्यात चौकाचौकात वडापाव अगदी सहज मिळतो. यातही जम्बो वडापाव, चीज वडापाव असे काही ना काही प्रकार आवर्जून बघायला मिळतात. कधी वडापावसोबत लसणाची चटणी तर कधी नुसती हिरवी मिरचीही याची टेस्ट आणखी वाढवते.
पण एकाने नेहमीच्याच वडापावला थोडा आणखी ट्विस्ट देऊन ग्रील्ड वडापाव पॉप्स (Grilled Vadapav Pops) तयार केले आहेत. यासाठी सुरुवातीला पाव सँडविच ज्या मशीनमध्ये ग्रील करतो त्या इलेक्ट्रीक मशीनमध्ये ठेवले आहेत. त्यामध्ये तळलेले वडे न ठेवता फक्त बटाट्याचे सारण गोलाकार करुन ठेवले आहेत. त्यावर आइस्क्रीमची काडी लावून त्यावर चिरलेला बारीक कांदा, लसणाची चटणी आणि चीजचे तुकडे टाकायचे. हे मशीन बंद करुन वडापाव ग्रील करायचा. बाहेर काढल्यावर त्यावर चीज आणि लसणाची चटणी घालून पॉप्ससारखा गरमागरम ग्रील वडापाव खायला घ्यायचा. हा पदार्थ करणे करणे किती सोपे आहे हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहून कळेलच. त्यातही यामध्ये वडा तळायची गरज नसल्याने तेल तर पोटात जाणार नाहीच पण ती एक स्टेप आणि वेळही वाचेल.
हा आगळावेगळा वडापाव सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. करायला सोपा आणि खायलाही सोप्या असलेल्या या कल्पनेचे नेटीझन्स कौतुकही करत आहेत. जवळपास ३ लाख जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून 'अ गार्निश बाऊल' (A Garnish Bowl) या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. अनेकांनी या आगळ्यावेगळ्या वडापावच्या कल्पनेला पसंतीही दर्शवली आहे. त्यामुळे पावसाळ्यात तुम्हाला वेगळं काही ट्राय करायचं असेल तर हा वडापाव हा नक्कीच चांगला पर्याय असू शकतो.