बाहुबली पाणीपुरी, बाहुबली लाडू तर आपण ऐकलेच हाेते, आता मार्केटमध्ये त्याच प्रकारातला बाहुबली सामोसा (bahubali Samosa) आला आहे... 'बाहुबली' हा चित्रपट येऊन गेल्यापासून बाहुबली हा शब्द बऱ्याचदा आपल्या बोलण्यातही अगदी सहज येऊन जातो. काहीतरी प्रचंड किंवा अतिशय भलंमोठं असं काही सांगायचं असेल तर अगदी सहज बाहुबली शब्द वापरून आपण त्याचं वर्णन करून टाकतो. तसंच काहीसं या समोस्याचंही आहे. खरे समोसाप्रेमी असाल, तर हे चॅलेंज एकदा घ्याच आणि खाऊन दाखवा हा भलमोठा बाहुबली समोसा. (viral video of bahubali samosa)
@hussain_tarana या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. नेमका हा समोसा तयार कसा होतो, हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं असून खरोखरंच ते बघणं खूपच इंटरेस्टिंग आहे. या पेजवर दिलेल्या माहितीनुसार हा समोसा खाऊन बघण्याची तुमची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला मेरठची खाऊगल्ली गाठावी लागेल. कारण हा अगडबंब समोसा सध्यातरी फक्त तिथेच केला जातो. आधी सांगितल्याप्रमाणे बाहुबली समोसा तब्बल ४ किलोचा असून तो उचलण्यासाठी आणि तळण्यासाठीच २ माणसांची गरज लागते.
नेहमीसारखा आपला लहानसा समोसा करण्यासाठी आपण साधारण पुरीएवढ्या आकाराची पुरी लाटतो. पण इथे तर समोसा करणाऱ्या त्या व्यक्तीने एक मोठी परात उलटी टाकली असून त्या परातीचा पोळपाटाप्रमाणे वापर करून तो समोस्याचा बेस लाटत आहे. ती भली मोठी पुरी लाटून झाल्यानंतर ती त्रिकाेणी आकारात गुंडाळून दोघाजणांनी त्यात सारण भरले. सारण भरल्यानंतर तो समोसा व्यवस्थित पॅक करणे आणि तळताना त्यातून सारण बाहेर येणार नाही, यापद्धतीने तो तळणे, त्यानंतर उकळत्या तेलाच्या कढईतून तो सहीसलामत बाहेर काढणं, खरोखरंच मोठं कौशल्याचं काम आहे. आपल्या साध्या समोस्यापेक्षा कित्येकतरी पटींनी मोठा असणारा हा सामोसा तब्बल ११०० रुपयांना मिळतो आहे. बघा घेणार का हे चॅलेंज आणि खाणार का हा बाहुबली समोसा?