Lokmat Sakhi >Social Viral > करिना कपूरची टाय- डाय जॉगर्स पाहिली? घरच्याघरी असे टाय-डाय सहज करता येईल; सोप्पे काम!

करिना कपूरची टाय- डाय जॉगर्स पाहिली? घरच्याघरी असे टाय-डाय सहज करता येईल; सोप्पे काम!

करिना कपूरचे काही फोटो सोशल मिडियावर नुकतेच व्हायरल झाले आहेत. या मध्ये तिने घातलेले टाय- डाय प्रकारातली जॉगर्स अतिशय लक्षवेधी ठरली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 04:24 PM2021-10-04T16:24:53+5:302021-10-04T16:26:17+5:30

करिना कपूरचे काही फोटो सोशल मिडियावर नुकतेच व्हायरल झाले आहेत. या मध्ये तिने घातलेले टाय- डाय प्रकारातली जॉगर्स अतिशय लक्षवेधी ठरली आहे.

Have you seen Kareena Kapoor's tie-dye joggers? Such a tie-dye can be done easily at home; Easy work! | करिना कपूरची टाय- डाय जॉगर्स पाहिली? घरच्याघरी असे टाय-डाय सहज करता येईल; सोप्पे काम!

करिना कपूरची टाय- डाय जॉगर्स पाहिली? घरच्याघरी असे टाय-डाय सहज करता येईल; सोप्पे काम!

Highlightsबांधणी करण्यासाठी कपड्याला दोरा गुंडाळावा लागतो. हा दोरा आपण किती व्यवस्थित आणि किती पक्का गुंडाळतो आहोत, यावर बांधणी कामाचे सौंदर्य दडलेले असते. 

करिना कपूरचे संडे रिलॅक्स मूड दाखविणारे फोटो तिने नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये करिनाने डेनिम ब्लू शर्ट घातला असून त्यावर तिने टाय- डाय जॉगर्स घातली आहे. ही जॉगर्स बघताक्षणीच लक्ष वेधून घेणारी आहे. काही दिवसांपूर्वीदेखील करिनाने अशाच प्रकारचा टीशर्ट घातला होता. यामध्ये नारंगी आणि पिवळ्या रंगाचा वापर करून डाईंग करण्यात आले होते. करिनाचा तो टी शर्टही सोशल मिडियावर चांगलाच हीट झाला होता. त्यानंतर आता करिनाची ही जॉगर्स चांगलीच गाजते आहे. 


बांधणी हा प्रकार अतिशय लोकप्रिय आहे.  कुर्ता, ओढणी, साडी, जॅकेट, बेडशीट, सोफा कव्हर अशा सर्वच  प्रकारावर बांधणी काम करता येते. बांधणीचे कपडे ऑल टाईम हिट असून निश्चितच हटके लूक देणारे ठरतात. विशेष म्हणजे जसे विणकाम, भरतकाम या गोष्टी आपल्याला घरच्या घरी करता येतात, अगदी तसंच बांधणी देखील आपल्याला घरच्या घरी करता येते. कधी कधी असं होतं की काही कपड्यांचा आपल्याला कंटाळा येतो. ते कपडे मुळीच घालावेसे वाटत नाहीत. पण तरी ते अजिबातच खराब झालेले नसल्याने आपल्याला ते टाकूनही देता येत नाहीत. अशा कपड्यांवर नक्कीच बांधणीकाम करता येऊ शकते. जुन्याच कपड्यांना मिळालेला नवा लूक कदाचित तुम्हाला आवडूही शकतो. म्हणूनच घरच्या घरी कपड्यांवर बांधणी कशी करायची हे जाणून घ्या. 

 

घरच्या घरीच कपड्यांवर करा बांधणी
- सगळ्यात आधी ही गोष्ट लक्षात घ्या की जॉर्जेट, पॉलिस्टर या कपड्यावर आपल्याला बांधणी करता येत नाही.
- बांधणी करण्यासाठी सुती कपडा अतिशय चांगला मानला जातो. त्याशिवाय होजियरी, मलमल, सिल्क, शिफॉन या कपड्यांवरही बांधणी करता येते.
- बांधणी करण्यासाठी कॉईन, मोती, गोट्या, चणे, राजमा, दोरी, नाडा, सुतळी, कपड्यांचा चिमटा, पाईप, पेन, पेन्सिल अशा अनेक वस्तूंचा वापर करता येतो. 


- बांधणी करण्यासाठी कपड्याला दोरा गुंडाळावा लागतो. हा दोरा आपण किती व्यवस्थित आणि किती पक्का गुंडाळतो आहोत, यावर बांधणी कामाचे सौंदर्य दडलेले असते. 
- कारण दोरा गुंडाळलेल्या भागावर बांधणीचा रंग लागत नाही. तो भाग तसाच पांढरा किंवा कमी रंगलेला रहावा, म्हणून आपण दोरा गुंडाळत असतो. जर दोराच सैलसर झाला तर सगळाच भाग रंगून जाईल आणि बांधणी कामात काही मजाच राहणार नाही. म्हणून दोरा पक्का गुंडाळायचा, ही गोष्टी बांधणी करताना लक्षात ठेवावी. 

 

कशी करायची बांधणी?
- आधी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून आपल्याला बांधणी करता येते. आता आपण मोत्यांचा वापर करून बांधणी कशी करायची, ते पाहू. 
- ज्या कपड्यावर बांधणी करायची आहे, त्या कपड्यावर ठराविक अंतराने मोती ठेवा आणि मोतीभोवती पेन्सिलीने गोल काढून घ्या.
- यानंतर आता माेती कपड्यात गुंडाळा आणि दोऱ्याच्या साहाय्याने मोतीभोवती कपडा गुंडाळून टाका.
- आता एकेक करून सगळे मोती दोऱ्याने कपड्यामध्ये गुंडाळून टाका.
- माेती नसल्यास हरबऱ्यांचा वापरही तुम्ही करू शकता. 
- आता सगळे मोती गुंडाळून झाल्यानंतर कपडा ओला करा.


- त्यानंतर एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा. पाणी उकळल्यानंतर त्यात एक टेबलस्पून मीठ, एक टेबलस्पून कपडे धुण्याची कोणतीही पावडर आणि एक टेबलस्पून कलर फिक्सर टाका. 
- सगळ्यात शेवटी त्यात डाईंग कलर टाका. डाईंग कलर बाजारात सहज उपलब्ध असतात. किंवा तुम्ही ते ऑनलाईन देखील मागवू शकता. 
- आता या रंगाच्या पाण्यात तुमचा कपडा बुडवा. १ ते २ मिनिट तो त्या पाण्यात राहू द्या.
- त्यानंतर कपडा गरम पाण्यातून काढा आणि साध्या पाण्यात काही वेळ बूडवून ठेवा.
- त्यानंतर थंड पाण्यातून कपडा बाहेर काढून सुकू द्या.


- कपडा सुकल्यानंतर त्याभोवती गुंडाळलेले दोरे सोडा. आता ज्या ठिकाणी दोरा गुंडाळलेला होता तो भाग सोडून उर्वरित भाग मस्त रंगीत झाला असेल.
- असाच प्रयोग कॉईन, पाईप, चिमटा आणि इतर साहित्य वापरून करू शकता. 
- दोन रंग हवे असतील तर अर्धा कपडा वेगळ्या रंगात आणि अर्धा कपडा वेगळ्या रंगात बुडवावा.
- अशा पद्धतीने तुम्ही घरीच मस्त आकर्षक बांधणी तयार करू शकता. 
 

Web Title: Have you seen Kareena Kapoor's tie-dye joggers? Such a tie-dye can be done easily at home; Easy work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.