हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, सुगम संगीत त्याचप्रमाणे बॉलीवूडची गाणी (bollywood songs) यांची प्रचंड क्रेझ परदेशी लोकांमध्ये दिसून येते. म्हणूनच तर परदेशातही शास्त्रीय गीतांच्या मैफिली होतात, भारतीय गायक- गायिका वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन कॉन्सर्ट करतात. आणि विशेष म्हणजे या सगळ्याच गाण्यांना उदंड प्रतिसादही मिळतो. हिंदी भाषा कळत नसली तरी तिचा गोडवा असा गाण्यांच्या, कलेच्या माध्यमातून जगभरातल्या लोकांना जाणवतोच. म्हणूनच अनेक परदेशी गायक- गायिकाही आवर्जून हिंदी गाणी गातात. यापैकीच एक आहे तजाकिस्तानची गायिका नोझिया करोमातुल्लो (Tajik singer Noziya Karomatullo).
कोण आहे नाेझिया करोमातुल्लो?नोझिया ही मुळची तजाकिस्तानची गायिका आणि नृत्यांगना. ३० वर्षांची ही गायिका ताजिक तसेच पार्शियन भाषेतील गाणी गाते. पण या दोन भाषांएवढंच प्रेम तिचं हिंदी भाषेवरही आहे. त्यामुळे ती हिंदी गाणीही मोठ्या खुबीनं गाते. काही वर्षांपुर्वी तिने आशा भोसले यांचं ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए’ हे गाणं गायलं होतं. हे गाणं सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल झालं आणि तेव्हापासून नोझियाला भारतातही ओळखलं जाऊ लागलं. आज हिंदी दिनानिमित्त तिच्या या गाण्याचा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे.
दिल्लीमध्ये घेतलं गाण्याचं शिक्षणनोझियाची हिंदी एवढी उत्तम कशी, हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. यामागचं कारण म्हणजे तिने अनेक वर्षे भारतात वास्तव्य केलं आहे. २००५ साली ती शास्त्रीय संगीत आणि नृत्य यांचा डिप्लोमा करण्यासाठी भारतात आली होती. २०१० पर्यंत दिल्ली येथे राहून तिने तिचं शिक्षण पुर्ण केलं. शास्त्रीय संगीतासोबतच ती कथ्थक नृत्यही शिकली. आधीच तिला हिंदी गाणी आवडायची. त्यात इथे राहिल्यामुळे तिच्या आवडीला अधिक बहर आला आणि ती अचूक अस्स्खलित उच्चारांसह हिंदी गाणी गाऊ लागली.