Join us  

Home Cleaning Tips : कितीही आवरलं तरी घरभर पसाराच? घर आवरण्याच्या ५ सोप्या टिप्स; घर एकदम चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 1:39 PM

Home Cleaning Tips : कामांच्या यादीतही ज्या कामाला फारशी किंमत नाही तरी अतिशय महत्त्वाचे असलेले हे काम सोपे व्हावे यासाठी काही खास टिप्स

ठळक मुद्देआवरायला घ्यायच्या आधीच काय कसे आवरायचे याचे योग्य पद्धतीने नियोजन केले तर आपले काम आणखी सोपे होऊ शकेल. घरातील वस्तूंचे आणि कामांचे नियोजन योग्य असेल तर घर आवरताना फारसा ताण येणार नाही

घरातला पसारा कितीही आवरला तरी तो संपतच नाही. एकवेळ ऑफीसला गेलेलं परवडतं पण घरातला पसारा काही केल्या कमी व्हायचं नाव घेत नाही. दर काही वेळानी मुलं अगदी मोठी माणसंही घेतलेल्या वस्तू कुठेही टाकत असल्याने घर म्हणजे नुसता पसारा होऊन जातो. एकवेळ आतल्या खोलीत किंवा कपाटाच्या आत थोडा पसारा असेल तर ठिक आहे पण हॉलमध्ये किंवा अगदी किचनमध्येही पसारा असला की काही सुधरत नाही (Home Cleaning Tips). अनेकांना तर पसारा नुसता पाहिला तरी खूप त्रास होतो. अशावेळी सतत घर आवरणे शक्य नसते. पण अचानक येणारे पाहुणे किंवा अगदी आपल्याही डोळ्याला बरे वाटावे यासाठी पसारा वेळच्या वेळी आवरण्याशिवाय पर्याय नसतो. पसारा आवरणे हे कामांच्या यादीत धरले न जाणारे काम असल्याने आपल्याला कोणी विचारले तू अमुक वेळात काय केलेस तर कोणत्या खोलीत किती वस्तू आणि पसारा पडलो होता हे आपण तोंडी सांगू शकत नाही. त्यामुळे कामांच्या यादीतही ज्या कामाला किंमत नाही तरी अतिशय महत्त्वाचे असलेले हे काम सोपे व्हावे यासाठी काही खास टिप्स आपण आज पाहणार आहोत. यामुळे आपला वेळ तर वाचेलच पण कमीत कमी पसारा झाल्याने आपल्याला घरात फ्रेशही वाटेल. 

१. खिडकीचे कठडे आवरा

अनेकदा आपल्याला हातात येईल ती वस्तू आहे तिथेच ठेवण्याची सवय असते. खिडकीचे कट्टे ही त्यासाठी अतिशय सोयीची जागा असल्याने या कट्ट्य़ांवर घेतलेल्या वस्तू सहज ठेवल्या जातात. मात्र या कट्ट्यांवर शोभेच्या वस्तू, रोपांच्या कुंड्या अशा गोष्टी ठेवल्यास व्यक्ती याठिकाणी वस्तू ठेवणार नाही आणि नकळतच ही जागा आवरण्याची तसदी राहणार नाही.

२. न लागणारे सामान ठेवून द्या

आपल्याला न लागणाऱ्या, आपण कित्येक महिने न वापरत असलेल्या अनेक वस्तू आपल्या घरात गॅलरील, कपाटात पडलेल्या असतात. या वस्तू आपल्याला नियमीतपणे लागत नसूनही त्यांच्याविषयी आपल्या मनात एक खास जागा असल्याने आपण त्या जपून ठेवतो. अशा वस्तू जपूण ठेवणे ठिक आहे. पण त्या लागत नसतील तर वेळीच माळ्यावर, बेडच्या आतल्या कप्प्यात ठेवाव्यात. ज्यामुळे नकळतच पसारा कमी होऊन आहे त्या वस्तू ठेवायला जास्त जागा मिळू शकते. 

३. नवीन आणाल्यावर जुने टाकून द्या

आपल्याला आपल्या सगळ्याच गोष्टींबाबत फार प्रेम असते त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी अतिशय जपून वापरतो. इतकेच नाही तर एखादी गोष्ट खराब झाली म्हणून आपण नवीन आणतोही मात्र जुन्या वस्तूत आपला जीव अडकलेला असल्याने ती फेकून देण्यासाठी आपण १० वेळा विचार करतो. मात्र या वस्तूचा आता म्हणावा तसा उपयोग नसल्याने ती टाकून दिलेली केव्हीह चांगली. त्यामुळे आपल्या घरातील जागा वाचेल आणि विनाकारण वस्तूंची गर्दीही होणार नाही. 

(Image : Google)

४. लहान वस्तूंसाठी एखादी बास्केट करा

घरात आलो की आपण हातातले घड्याळ काढतो. किल्ल्या काढून ठेवतो. अनेकदा ब्रेसलेट, कानातले असे दागिनेही काढून ठेवतो. अशा लहान वस्तू ठेवण्यासाठी एखादे बास्केट करा. म्हणजे या वस्तू अस्ताव्यस्त तर पडणार नाहीतच. पण वेळेला त्या आपल्याला अगदी सहज सापडतील. इतकेच नाही तर अनेकदा आपल्याला हाताशी लागतील अशा रबरबँड, स्टेपलर, सेफ्टी पिन अशा वस्तूही या बॉक्समध्ये नीट ठेवल्याने त्या पटकन हाताशी मिळण्यास मदत होते. 

५. एकावेळी एक कोपरा किंवा रुम आवरा

एक दिवस ठरवून घराचा एखादा कोपरा आवरा. त्यानंतर याठिकाणी कमीत कमी पसारा होईल असे बघा. एखादी खोली आवरली तर त्या खोलीतील जास्तीत जास्त वस्तू कपाटात किंवा रॅकमध्ये व्यवस्थित राहतील याची काळजी घ्या. म्हणजे सतत पसारा होणार नाही आणि तो आपल्याला आवरावाही लागणार नाही. एकदम सगळे आवरायला काढले तर आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकायला होऊ शकते. आवरायला घ्यायच्या आधीच काय कसे आवरायचे याचे योग्य पद्धतीने नियोजन केले तर आपले काम आणखी सोपे होऊ शकेल.  

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्ससुंदर गृहनियोजन