गौरी-गणपती येणार म्हटलं की घरोघरी एकच उत्साह असतो. आपल्या घरात बाप्पासाठी जागा तयार करणे, घर साफ करणे, बाप्पासाठी डेकोरेशन करणे, त्याच्या आवडीचे मोदक आणि नैवेद्याचे पदार्थ करणे अशी सगळी एकच धांदल उडून जाते. बहुतांश वेळा या सगळ्या कामांचा लोड हा घरातील महिलांवरच जास्त येतो. वर्षातून एकदा येणारा हा सण आनंदात साजरा करताना महिला मात्र पार थकून जातात. त्यात नोकरी करणाऱ्या महिला असतील तर त्यांची आणखीनच दमछाक होते. कारण सगळे करताना खऱ्या अर्थाने तारेवरची कसरत होत असते. अशावेळी गणपती उत्सव अवघ्या आठवडाभरावर राहीला असताना साफसफाई करताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात. जेणेकरुन आपली दमणूक होणार नाही आणि घरही अगदी कमी वेळात छान चकाचक होईल (Home Cleaning Tips For Gauri Ganpati Festival) .
१. जागा मोकळी करताना
बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यासाठी तसेच गौरींसाठी आपण घरातील नेहमीचे सामान काहीसे बाजूला काढतो. अवघ्या काही दिवसांचा प्रश्न असला तरीही आपल्याला ही हलवाहलवी करावी लागते. यावेळीच घरातील अनावश्यक सामान माळ्यावर किंवा बाल्कनीमध्ये ठेवून द्यायला हवे. नको असलेले सामान घरातून काढून चाकायला हवे. यामुळे घर नकळत स्वच्छ व्हायला मदत होते.
२. प्रत्यक्ष साफसफाई करताना
साफसफाईला सुरुवात करताना आधी वरच्या बाजूची साफसफाई करावी. जेणेकरुन वर असलेली धूळ, जळमट खाली पडेल आणि खोल्या साफ करताना ते निघून जाईल. आपल्या घराच्या खोल्या, प्रत्येक खोलीचा आकार आणि त्यातील वस्तू यांचा अंदाज घेऊन कोणत्या दिवशी कोणत्या खोल्या साफ करायच्या याचे आधीच योग्य पद्धतीने प्लॅनिंग करायला हवे. त्यामुळे काम झटपट होण्यास मदत होईल.
३. मदत घ्यायला हवी
बरेचदा महिलांना सगळे आपण एकटीनेच करण्याची सवय असते. बाकीच्यांना त्रास नको, ते दमतात असं म्हणून महिला सगळी कामं स्वत: करत राहतात. पण त्याचा महिलांच्या तब्येतीवर कळत, नकळत परीणाम होत असतो. उत्साहाच्या भरात आपण सगळं करायला जातो पण नंतर याची शरीरावर आणि मनावर परीणाम होतो. त्यामुळे घरातील व्यक्तींची, मदतनीसांची योग्य पद्धतीने, गोड बोलून मदत घ्यायला हवी.
४. उपकरणांचा वापर करावा
आजकाल बाजारात साफसफाई करण्यासाठी बरीच उपकरणे मिळतात. या उपकरणांचा वापर आपण नक्की करुन घेऊ शकतो. त्यामुळे आपले काम सोपे होण्यास मदत होते. वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुणे, व्हॅक्युम क्लिनरसारख्या गोष्टींचा वापर करणे, पुसण्यासाठी सोप्या पद्धतीने वापरता येतील असे वाईप्स आणायला हवेत. यामुळे काम झटपट होते आणि जास्त एनर्जीही वापरावी लागत नाही.