Join us  

पावसाळ्यात अशी करा घराची झटपट साफसफाई, ४ टिप्स घर राहील कायम चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2023 9:36 AM

Home Cleaning Tips For Monsoon : बरेचदा पावसाळ्याने दमट हवा असल्याने घरभर कुबट वास येतो.

आपण राहत असलेलं घर कायम स्वच्छ आणि चकचकीत असावं असं आपल्याला वाटतं. अनेकांना तर घरात थोडा जरी कचरा दिसला तरी ते हातात झाडू घेऊन झाडायला लागतात. काही महिलांना तर इतकी स्वच्छता लागते की घरात कोणत्याही वेळेला त्यांच्या हातात फडकं दिसतं आणि त्या सतत फर्निचर आणि फरशी किंवा काही ना काही पुसताना, साफ करताना दिसतात. पावसाळ्याच्या दिवसांत अनेकदा घरात पायानी चिखल होतो, काही वेळा सोसाट्याचा वारा सुटला की घरात खूप माती येते. बरेचदा पावसाळ्याने दमट हवा असल्याने घरभर कुबट वास येतो. हे सगळे साफ केले नाही तर आपल्याला अस्वच्छ वाटते. असे होऊ नये म्हणून वेळच्या वेळी योग्य ती काळजी घेतल्यास घर स्वच्छ राहायला मदत होते आणि आपले स्वच्छतेचे कामही सोपे होते. यासाठी नेमके काय करायचे पाहूया (Home Cleaning Tips For Monsoon)...

१. डोअर मॅट

अनेकदा आपण पावसातून खूप भिजत घरी येतो. काही वेळा आपण खूप भिजलेले नसतो पण चिखलाने आपले पाय पूर्ण खराब झालेले असतात. अशावेळी डोअर मॅटचा अवश्य वापर करा. त्यामुळे पाय पुसून घरात येता येईल. इतकेच नाही तर घराला गॅलरी किंवा टेरेस असेल तर तिथेही आवर्जून डोअर मॅट घाला. म्हणजे चिखलाचे, मातीचे पाय सतत घरात येणार नाहीत आणि घर स्वच्छ राहील.

(Image : Google)

२. कपाटं, ट्रॉली उघड्या ठेवा

पावसाळी हवा असेल तर घरात एकप्रकारचा दमट किंवा कोंदटपणा राहण्याची शक्यता असते. अशावेळी विशेषत: किचनमधील ट्रॉली, कपाटं काही वेळासाठी का होईना उघडी ठेवा. सतत बंद ठेवले तर याठिकाणी कुबट वास येण्याची शक्यता असते. कपड्यांची आणि इतर कपाटेही रात्रभर उघडी ठेवा म्हणजे हवा खेळती राहील आणि कुजटपणा दूर होण्यास मदत होईल.

३. खिडक्यांना जाळी किंवा पडदे अवश्य लावा

पावसाळ्यात सोसाट्याचा वारा सुटतो आणि आजुबाजूची सगळी धूळ आपल्या घरात येते. त्यामुळे वारा सुटेल असे वाटते तेव्हा शक्यतो खिडकीच्या काचा, जाळ्या, पडदे व्यवस्थित लावून घ्या. म्हणजे घरात आणि फर्निचरवर अनावश्यक धूळ साचणार नाही. 

(Image : Google)

४. किटकांकडे लक्ष द्या

पावसाळ्यात दमट हवेमुळे मुंग्या, बाथरुममध्ये गांडूळ, फर्निचरमध्ये वाळवी आणि घरात डास किंवा माश्या होण्याची शक्यता असते. असे होऊ नये म्हणून घरातील हवा जास्तीत जास्त खेळती राहील असा प्रयत्न करा. घरातील ओलावा आणि उबटपणा कमी व्हावा यासाठी आपण खोलीत नसू तेव्हा त्याठिकाणचा फॅन लावा. पाणी साठू देऊ नका. त्यामुळे घर स्वच्छ राहण्यास मदत होईल. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्समोसमी पाऊस