चाकू हे स्वयंपाक घरातील असे एक उपकरण आहे, ज्याशिवाय प्रत्येकीचे काम अडते.. सकाळच्या धावपळीत तर भाज्या, फळं, सॅलड चिरण्याची एकच लगबग असते. अशा वेळी जर चाकुची धार कमी होऊन तो बोथट झाला असेल, तर मग मात्र होणारी धांदल विचारायलाच नको. भाज्या सरसर चिरल्या गेल्या नाहीत की पुढचे सगळे नियोजन हुकते आणि मग आपली आपल्यावरच चिडचिड होते.. म्हणूनच स्वयंपाक घरातला चाकू धारदार (how to sharpen knife at home?) असणं ही प्रत्येकीची गरज आहे...
चाकू जुना होतो, त्याचा आणि पाण्याचा वारंवार संपर्क येतो. मग अशावेळी काही काळाने चाकूची धार कमी हाेणं अगदी साहजिकच आहे. चाकू बोथट झाला म्हणून तो लगेच वापरणं थांबवून टाकू नका. नवा चाकू विकत आणण्याआधी धार गेलेल्या चाकुसोबत हा असा सोपा प्रयोग करून बघा.. यामुळे चाकू धारदार तर होईलच, शिवाय नविन चाकू घेणं टळल्यामुळे पैसेही वाचतील.
करून बघा हे ३ सोपे उपाय (home remedies for sharpening knife)
१. सहान
बऱ्याच घरात देवघरामध्ये सहान नक्कीच सापडते. सहानीचा उपयोग चंदनाचं खोड उगाळण्यासाठी केला जातो. ही सहान आपल्याला चाकुला धार लावायला खूपच उपयोगी पडते. सहानीच्या मदतीने चाकुला धार लावायची असेल तर सहानीच्या टोकावर चाकुची ज्या बाजूची धार बोथट झाली आहे, ती बाजू घासावी. खालून आणि वरतून दोन्ही बाजूने चाकू घासावा. एकेका बाजूने प्रत्येकी ५ ते १० मिनिटे घासल्यावर चाकुची धार अगदी तेज होऊन जाईल.
२. वर्तमान पत्र
वर्तमान पत्रासाठी वापरली जाणारी शाई चाकूला धार लावण्यासाठी उपयुक्त ठरते. पण यासाठी वापरण्यात येणारे वर्तमानपत्र खूप जुने नको. अगदी एक- दोन दिवस जुने वर्तमान पत्र तुम्ही यासाठी घेऊ शकता. हा प्रयोग करण्यासाठी वर्तमान पत्र एखाद्या पायरीवर किंवा ओट्यावर ठेवा. यानंतर त्यावर चाकू ठेवा. आणि वर- खाली याप्रमाणे चाकू घासा. वर्तमान पत्र दुमडून त्यात चाकू ठेवून जरी तो वर- खाली केला तरी धार लागली जाऊ शकते. हा प्रयोग करताना मात्र तुमचा हात सांभाळा.
३. पायरी किंवा फरशी
तुमच्या घरी पायरीला शहाबादी फरशी लावलेली असेल तर तिचा उपयोग करूनही तुम्ही चाकुला धार लावू शकता. यासाठी चाकू फरशीच्या टोकावर तिरका धरून घासा. खालून- वरून दोन्ही बाजूने ५ ते १० मिनिटे घासल्यानंतर चांगली धार लागेल.