उन्हाळा सुरू झाला की हवेतील उष्णता वाढते. त्यामुळे साहजिकच गारवा शोधण्यासाठी मुंग्याही बाहेर पडतात. उन्हाळ्याच्या दिवसांत मुंग्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसते. किचनमधील सिंकच्या आसपास, ओट्यावर, अन्नाच्या आजुबाजूला या मुंग्यांची रांगच्या रांग तयार झालेली दिसते. काहीवेळा या मुंग्या अगदी बारीक असतात तर काहीवेळा त्या मोठ्या आणि लाल चावणाऱ्या असतात. काळ्या मुंग्यांचे प्रमाणही उन्हाळ्यात वाढते (Home Remedies to Get Rid From Ants).
कधी एखाद्या गोड पदार्थाला नाहीतर ओट्यावर, बाथरुमच्या आजुबाजूला या मुंग्या रांगेने फिरताना दिसतात. एखाद्या पदार्थाला मुंग्या लागल्या की तो पदार्थ खायची इच्छा होत नाही. इतकेच नाही तर या मुंग्या चावल्याने खाज येणे, फोड येणे अशा समस्याही उद्भवतात. म्हणूनच या मुंग्या कमी व्हाव्यात यासाठी नेमकं काय करता येईल असा प्रश्न कदाचित आपल्याला पडला असेल तर आज त्यासाठीच आपण काही सोपे उपाय पाहणार आहोत.
१. मीठ
ही घरात सहज उपलब्ध असणारी गोष्ट असून मुंग्या घालवण्यासाठी मीठाचा चांगला उपयोग होतो. यासाठी एका भांड्यात पाणी घ्यावं. त्यात भरपूर मीठ घालावं. मीठ घालून ते पाणी भरपूर उकळावं. नंतर हे पाणी सामान्य तापमानाला येवू द्यावं. हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरावं. जिथे जिथे मुंग्या नेहमी होतात त्या ठिकाही मिठाचं पाणी फवारावं. इतकं करणं शक्य नसेल तर मुंग्या असलेल्या ठिकाणी रात्री झोपताना मीठ टाकून ठेवावं. सकाळी मुंग्या गेलेल्या दिसतात.
२. लवंग आणि दालचिनी
मसाल्याच्या पदार्थातील हे दोन्ही पदार्थ काहीसे उग्र वासाचे असतात. मुंग्यांना या उग्र वासाचा त्रास होतो. त्यामुळे मुंग्या असलेल्या ठिकाणी हे दोन्ही ठेवल्यास मुंग्या निघून जाण्यास मदत होते. तसेच पाण्यात या दोन्हीची पूड करुन ती फवारल्यासही चांगला उपयोग होतो.
३. व्हिनेगर
व्हिनेगर आपण साफसफाई किंवा इतर अनेक गोष्टींसाठी वापरतो. त्याचप्रमाणे मुंग्या घालवण्यासाठीही त्याचा चांगला उपयोग होतो. व्हिनेगरमध्ये पाणी घालून ते स्प्रे बॉटलमध्ये भरुन ठेवा. घरात ज्या ठिकाणी मुंग्या आहेत तिथे ते स्प्रे करा. त्यामुळे मुंग्या निघून जाण्यास मदत होते.
४. कापूर
आपल्याकडे देवघरात साधारणपणे कापूर असतोच. कापूराचा वासही उग्र असल्याने मुंग्या जाण्यासाठी कापूर हा उत्तम उपाय ठरु शकतो. भिंतीच्या कडेला, ट्रॉलीमध्ये किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी कापराच्या वड्या ठेवल्या तर मुंग्या जाण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो.