घाईगडबडीत स्वयंपाक करताना, खाताना किंवा देवाचा दिवा लावताना आपल्या कपड्यांवर नकळत तेलाचे डाग पडतात. तेलाचे हे डाग इतके चिकट असतात की काही केल्या ते निघत नाहीत. कपडे पांढरे किंवा फिकट रंगाचे असले तर हे डाग जास्त उठून दिसतात. फोडणीचे तेल असेल तर कपडे पूर्ण पिवळट होतात. सुती कपड्यावर हे डाग पटकन पसरतात आणि वाढतातही. ऑफीसमध्ये किंवा बाहेर कुठे गेल्यावर असे काही झाले की आपल्याला एकजम लाजल्यासारखे होते. हे कपडे आपण घरी आल्यावर धुवायला टाकतो. मात्र वॉशिंग मशीनमध्ये हे डाग निघतातच असे नाही. बरेचदा कपडे साबण लावून किंवा अन्य काही सोल्यूशन लावून ब्रशने कितीही घासले तरी हे डाग निघत नाहीत (Home Remedies to Remove oil Stains on Clothes).
हे तेलाचे डाग कपड्यांवर एकदा डाग तसेच राहीले की नंतर ते कापडात मुरतात आणि मग काही केल्या ते निघत नाहीत. लहान मुलांचे शाळेचे कपडे तर साधारणपणे पांढरे असतात तसेच पुरुषांचे कपडेही फिकट रंगाचे असतात. जेवताना एखादा घास जरी चुकून सांडला तरी हे डाग समोरच्या बाजुला असल्याने अतिशय वाईट दिसतात. कपडे ब्रँडेड आणि महागाचे असतील तर हे कपडे ड्रायक्लिनिंगला टाकावे लागतात. ड्रायक्लिनिंगचे रेट गेल्या काही वर्षात खूप जास्त वाढल्याने आपल्याला सतत ड्रायक्लिनिंग करणे परवडतेच असे नाही. अशावेळी घरच्या घरी अगदी ५ मिनीटांत कपडे न घासता, कोणतेही केमिकल न वापरता कपड्यांवरचे डाग काढण्यासाठी काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. आज आपण घरात सहज उपलब्ध असणाऱ्या एका गोष्टीपासून तेलाचे डाग काढण्याचा सोपा उपाय पाहूया...
उपाय काय?
बेबी पावडर ही बाजारात अगदी कमी किमतीत कुठेही मिळणारी गोष्ट असते. हीच बेबी पावडर घेऊन कपड्यावर ज्या ठिकाणी तेलाचा डाग पडला आहे त्याठिकाणी पावडर टाकायची. १० मिनीटे ही पावडर डागावर तशीच ठेवायची आणि मग एखाद्या कापडाने किंवा टिश्यू पेपरने ही पावडर पुसायची. पावडरने तेल शोषले जात असल्याने कपड्यावरचे तेल निघून जाण्यास मदत होते. हा उपाय अगदी झटपट करता येणारा असून स्वस्तात मस्त असा असल्याने तुमच्याही कपड्यांवर डाग पडले असतील तर नक्की ट्राय करा.