आपण रडायला लागलो की आपल्याला कोणाच्या तरी आधाराची गरज असते. लहान बाळ रडत असेल आणि त्याला जवळ घेतले की ते शांत होते. इतकेच काय पण अगदी कोणत्याही वयात आपल्या दु:खाची भावना रडण्यातून व्यक्त करत असताना आपल्याला मायेच्या किंवा दिलासा देणाऱ्या खांद्याची गरज असते. रडणे ही दु:ख व्यक्त करण्याची भावना असली तरी त्यावेळी आपल्याला सोबत कोणीतरी असावे, आपल्याला चांगला आधार द्यावा असे वाटते. आपल्या आजुबाजूला नातेवाईक किंवा मित्रमंडळी असे अनेक जण असतात, ज्यांच्याकडे आपले दु:ख आपण मोकळेपणाने व्यक्त करु शकतो. पण काही वेळा प्राणीही आपल्याला यामध्ये साथ देऊ शकतात (Horse consoling Crying lady in emotional viral Video).
याचे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये घरातील पाळीव कुत्राम किंवा मांजर असे कोणी नाही तर चक्क घोडा एका महिलेला रडताना जवळ घेत असल्याचे दिसते. हे पाहून प्राण्यांनाही भावना असतात आणि आपल्या भावनांशी ते अतिशय चांगल्या पद्धतीने कनेक्ट होऊ शकतात यावर आपला विश्वास बसल्याशिवाय राहणार नाही. तर या व्हिडिओमध्ये एक महिला खाली बसून रडत असल्याचे दिसते. ती हुंदके देऊन रडत असताना तिच्या बाजूला असलेल्या घोड्याला हे समजते आणि तो मानेनेच तिला आपल्या जवळ ओढतो. त्याने जवळ घेतल्यावर आपण एखाद्या व्यक्तीच्या गळ्यात पडून ज्याप्रमाणे रडू त्याचप्रमाणे ही महिला पुन्हा तिच्या भावना मोकळ्या करते.
आपण ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या पाठीवरुन हात फिरवतो त्याचप्रमाणे हा घो़डाही या महिलेच्या पाठीवरुन आपले तोंड घासून तिला धीर देत असल्याचे दिसते. ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्याला मोठी कॅप्शनही देण्यात आली आहे. हा प्राणी अतिशय स्पेशल असून तो मनुष्याप्रमाणे भावनिक असतो. वडिलांच्या देवाघरी जाण्याच्या दुखा:त ही महिला रडत असताना सगळे घोडे तिच्या आजुबाजूला जमा होतात आणि तिला आधार देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे प्राण्यांमध्ये असणारे प्रेम आणि आपुलकी यानिमित्ताने दिसून येते. चार लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी तो रीट्विटही केला आहे.