सकाळी उठायचं, उठलं की आधी ब्रश करायचा आणि मग पुढच्या कामाला लागायचं... हे तर रोजचंच काम. अगदी लहान मुलं देखील या गोष्टी रोजच्या रोज करतात. मग त्याचं काय एवढं, असा विचार करून ही गोष्ट अगदीच क्षुल्लक समजत असाल, तर थांबा... कारण टुथब्रशची स्वच्छता (how to disinfect toothbrush) ही बाब वरवर पाहता अगदी साधी- सोपी वाटते.. ह्यात काय एवढं हे तर नेहमीचंच असंही वाटू शकतं.. पण म्हणूनच अशा नेहमीच्या गोष्टी कधीकधी अगदीच कॅज्युअली घेणंही धोक्याचं ठरू शकतं. म्हणूनच रोजचंच, सवयीचं असलं तरी ब्रशची स्वच्छता करताना तुम्ही या काही गोष्टी करता का? हे एकदा तपासून बघा. (4 steps of cleaning toothbrush)
टुथब्रशच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष कराल तर...- कोणताही संसर्ग होण्याचं प्रमुख माध्यम म्हणजे आपलं तोंड. इथे तर दिवसाची सुरुवातच आपण ब्रशपासून करतो. तोच जर अस्वच्छ असेल तर आपल्याला संसर्ग (infection from toothbrush) होणारच आणि त्यातून वेगवेगळे आजारही पाठीशी लागणारच.- कधी कधी एखाद्याला अकारण अपचनाचा त्रास होतो. उलट्या होतात. काही बाहेरचं खाणं ही झालेलं नसतं. मग अशावेळी हा त्रास का होत असावा, असा प्रश्न पडतो. अशावेळी टुथब्रशमुळे होणारं बॅक्टेरियल इन्फेक्शन (bacterial infection) हे देखील कारण असू शकतं. - वारंवार तोंड येत असेल, तोंडाला दुर्गंधी येत असेल तरीही ब्रशची स्वच्छता नियमित आणि व्यवस्थित होतेय, की नाही हे एकदा स्वत:चे स्वत:च तपासून पहा.
कशी करावी टुथब्रशची स्वच्छता?- याबाबतीत सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे एकच एक टुथब्रश वर्षानुवर्षे वापरू नये. दर ३ ते ६ महिन्यांनी ब्रश बदलावा.- ब्रश झाल्यानंतर ब्रश धुताना तो नुसता पाण्याखाली धरू नका. तुमच्या अंगठ्याने ब्रशचे ब्रिसल्स वरून खाली आणि खालून वर यादिशेने २ ते ३ वेळा फिरवा, जेणेकरून त्यातली घाण निघून जाईल.- ब्रश धुतल्यानंतर त्यातलं जास्तीचं पाणी झटकून टाका आणि ब्रश अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला स्वच्छ सुर्यप्रकाश आणि हवा लागेल. बरेच जण ब्रश बंदिस्त कप्प्यात ठेवून देतात, जिथे अजिबातच हवा, किंवा सुर्यप्रकाश नसतो. असे करणे खूप चुकीचे आहे कारण त्यामुळे ब्रशवर बॅक्टेरिया जमायला सुरुवात होते.- तसेच आपला टुथब्रश इतर कुणाच्याही टुथब्रशजवळ ठेवू नये. यामुळेही संसर्गाचा धोका वाढतो.
महिन्यातून एकदा अशीही काळजी घ्या..- अर्धा टीस्पून बेकिंग सोडा अर्धा कप पाण्यात टाका. त्यात १५ ते २० मिनिटे टुथब्रश बुडवून ठेवा. ब्रश स्वच्छ होईल.- ब्रशच्या स्वच्छतेसाठी सोड्याप्रमाणेच तुरटीचाही वापर करता येतो.- टुथब्रश स्वच्छ करण्यासाठी माऊथवॉशचाही वापर करता येतो. यासाठी टुथब्रश माऊथ वॉशमध्ये ३० ते ४० सेकंदासाठी भिजत ठेवा, त्यानंतर स्वच्छ धुवून घ्या.- टुथब्रश स्वच्छतेसाठी हायड्रोजन पॅराऑक्साईडचा वापर अधिक परिणामकारण मानला जातो. यासाठी अर्धा कप पाणी घ्या. त्यात हायड्रोजन पॅराऑक्साईडचे ४ ते ५ थेंब टाका. त्यात टुथब्रश एखादा मिनिट बुडवून ठेवा.