Join us  

किती तो निरागस गोंडस! कोकराला आईकडे नेण्यासाठी चिमुकल्याची धडपड; पाहा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 11:04 AM

या दोघांची भाषा एक नसली तरी त्यांच्यातील संवाद आणि त्यांची सुरू असलेली धडपड पाहून त्यांच्या निरागसपणाचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही.

ठळक मुद्देव्हिडीओला आतापर्यंत १.१ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत, तर ४३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.लहानग्या मुलाच्या आई-वडिलांनी अतिशय सुंदर असे हे क्षण कॅमेरात टिपले आहेत

लहान लेकरांसाठी आई जशी सर्वस्व असते तशीच लहान प्राण्यांचाही जीव आईविना कावराबावरा होत असल्याचे आपण अनेकदा पाहतो. जगात नव्याने आलेल्या प्रत्येक लहान जीवाला जगाची ओळख होईपर्यंत आपली आई म्हणजे एक सुरक्षित जागा, आधार आणि सगळं जग असते. लहान मुलं ज्याप्रमाणे काही वेळ आई दिसली नाही तर अस्वस्थ होतात आणि रडारड करतात तसेच काहीसे प्राण्यांच्या बाबतीतही होत असावे. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक कोकरु माळरानावर भरकटल्याचे दिसते. त्याला आपली आई सापडत नसल्याने ते बराच वेळ मॅ मॅ करताना दिसत आहे. पण या कोकराच्या मदतीला दुसरं तिसरं कोणी नाही तर त्याचे दु:ख समजून घेऊ शकणारे एक लहानगे बाळ येते. या दोघांची भाषा एक नसली तरी त्यांच्यातील संवाद आणि त्यांची सुरू असलेली धडपड पाहून त्यांच्या निरागसपणाचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. 

सोशल मीडियामुळे जग इतके जवळ आले आहे की जगाच्या कोपऱ्यात घडणारी एखादी गोष्ट अगदी सहज व्हायरल होते.  हा व्हिडीओ शिनजियांगच्या वायव्य चिनी प्रदेशातील तचेंग इथला असल्याचा अंदाज आहे. व्हिडीओमध्ये एक कोकरु आपली वाट चुकल्याचे दिसत आहे. तर दोन वर्षाचा लहान मुलगा एका त्या कोकराच्या बाजूने चालत त्याला पुढे बोट दाखवत दिशा देण्याचा प्रयत्न करतोय. हा चिमुकला ज्या दिशेने इशारा करतोय त्या दिशेने हे कोकरू आपल्या आईला शोधताना दिसतंय. काही पावलं आणखी पुढे गेल्यानंतर कोकराचा आवाज ऐकून त्याची आईही त्याला शोधत पुढे येते आणि अखेर आई भेटल्याच्या आनंदात हे कोकरु धावत जाऊन आईला बिलगते. 

आईची भेट झाल्यानंतर कोकरु सगळ्यात आधी दूध प्यायला सुरुवात करते आणि सुरक्षित वाटल्यानंतर ते दोघेही चालत पुढे माळरानाकडे जातात. या लहानग्या मुलाच्या आई-वडिलांनी अतिशय सुंदर असे हे क्षण कॅमेरात टिपले आहेत आणि ट्विटरवरील योगाफॉरेवर या पेजवर हे क्षण शेअर करण्यात आलेत. अवघ्या ३३ सेकंदांच्या या व्हिडिओला नेटीझन्सनी मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर केले असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून लोक चिमुकल्याच्या निरागसतेचं आणि गोंडसपणाचं कौतुक करताना दिसत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत १.१ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत, तर ४३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

टॅग्स :सोशल व्हायरलट्विटर