कोणत्या गोष्टीवरुन आपली ओळख निर्माण होईल हे कोणी सांगू शकत नाही. जगातील सर्वात उंच महिला होण्याचा मान तुर्की येथील २४ वर्षीय तरुणीने मिळवला आहे. रुमेयसा गेलगी असे तिचे नाव असून तिची उंची ७ फूट०.७ इंच म्हणजेच २१५.१६ सेंटीमीटर आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिच्या नावाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे या तरुणीला विव्हर सिंड्रोम हा आजार असून ती सामान्य जीवन जगू शकत नाही. हा एक दुर्मीळ आजार असून यामध्ये तुमची वाढ वेगाने होते. त्यामुळेच माझी उंची इतकी जास्त असल्याचे तिचे म्हणणे आहे. अशाप्रकारचा जेनेटीक आजार असणारी मी तुर्कीतील एकमेव मुलगी आहे असेही ती पुढे म्हणाली.
गिनिज रेकॉर्डच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक व्हिडियो शेअर करण्यात आला आहे. “वेगळे असणे ही वाईट गोष्ट नाही. तुम्ही याआधी कल्पनाही न केलेल्या गोष्टी तुम्ही साध्य करु शकता.” असे रुमेयसाबद्दल या व्हिडियोच्या खाली म्हणण्यात आले आहे. रुमेयसाा व्हीलचेअरवर असते किंवा वॉकरच्या आधाराने काही अंतर चालू शकते. २०१४ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी रुमेयसाच्या नावावर सर्वात उंच किशोरवयीन मुलगी असा विक्रम नोंदविण्यात आला होता. त्यामुळे आता दुसऱ्यांदा तिच नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आले आहे. कुटुंबियांकडून आपल्याला कायम खूप पाठिंबा मिळत असल्याचेही तिने सांगितले. लोकांना आपल्याबद्दल कुतूहल असले तरी अनेकजण माझ्याबाबतीत दयाळू असतात.
रुमेयसा म्हणाली "प्रत्येक नुकसान तुमच्यासाठी फायद्यात बदलू शकते म्हणून तुम्ही कोण आहात ते स्वीकारा, तुमच्या क्षमतेची जाणीव ठेवा आणि सर्वोत्तम प्रयत्न करा. योगायोग म्हणजे जगातील सर्वात उंच माणूस सुलतान कोसेन हा सुद्धा तुर्की मधलाच आहे. २०१८ मध्ये कोसेनची उंची ८ फूट २.८ इंच मोजली गेली. तर याआधी जगातील सर्वात उंच महिलेचा विक्रम चीनच्या जेंग जिनलियनच्या नावावार होता. १९८२ मध्ये त्यांचा मृत्यू झाला, त्यावेळी त्यांची उंची ८ फूट १ इंच होती. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या इन्स्टाग्राम पेजवर तिच्या व्हिडियोला २ दिवसांत ४.५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी या व्हिडियोवर प्रतिक्रिया देत तिचे कौतुक केले आहे.