दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. घराबाहेर, घरामध्ये भरपूर दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला की दिवाळीचा सण कसा खुलून येतो. दिव्यांशिवाय दिवाळीची मजा नाहीच. हल्ली वेगवेगळे इलेक्ट्रिक दिवे, पाण्यात चालणारे दिवे, बॅटरीवरचे दिवे, वेगवेगळ्या आकर्षक लाईटिंग बाजारात पाहायला मिळतात. आपण त्या मोठ्या हौशीने खरेदीही करतो. पण जोपर्यंत आपली पारंपरिक पणती (How to avoid oil leakage from panati or diwali diya?) अंगणात लागत नाही, तोपर्यंत दिवाळीला काही महत्त्व नाही (How to save oil from diwali diya?).
पण पणत्या लावल्या की नेमकी एक अडचण होते. सगळ्यात पहिली अडचण म्हणजे पणत्या खूप जास्त तेल शोषून घेतात. त्यामुळे मग तेलही खूप लागते.
एवढ्या महागाईच्या काळात एवढे तेल पणत्यांसाठी वापरायचे म्हणजे सर्वसामान्य माणसांना खरोखरच जिवावर येते. दुसरी एक अडचण म्हणजे पणत्यांमधून जे तेल झिरपते, त्यामुळे मग जमिनीवर तेलाचे डाग पडतात. तुमच्या या दोन्ही समस्या साेडविण्यासाठी हे बघा २ सोपे उपाय. हे उपाय केल्यामुळे एकतर तेलाचीही बचत होईल आणि दुसरं म्हणजे पणती ठेवली त्या ठिकाणी जमिनीवर डागही पडणार नाहीत.
पणत्यांमधून तेल गळू नये म्हणून..१. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे बाजारातून आणलेल्या पणत्या जशाच्या तशाच लावू नका. पणत्या घरी आणल्यानंतर त्या ५ ते ६ तासांसाठी पाण्यात चांगल्या भिजू द्या.
यासाठी एखादे खोलगट भांडे किंवा टब वापरा आणि त्यात सगळ्या पणत्या भिजत घाला. ५ ते ६ तासांनंतर पणत्या पाण्यातून बाहेर काढा. स्वच्छ कपड्याने पुसून घ्या आणि वाळू द्या. अशा पणत्यांमधून तेल गळत नाही.
२. दुसरा उपाय म्हणजे पाण्यात भिजवल्यानंतर पणत्या जेव्हा पुर्णपणे कोरड्या होतील, तेव्हा त्या पणतीला आतून- बाहेरून ॲक्रॅलिक रंग लावा. खूप बारीक रंगकाम करायला वेळ नसेल, तर सगळ्या पणतीवर एकच रंग मारा. या दोन्ही उपायांमुळे निश्चितच तेलाची बचत होईल.