नारळाचं वाटण घाटण हा अनेकांच्या स्वयंपाकातील महत्त्वाचा भाग असतो. काही जण आठवड्याचे वाटण करुन ठेवतात म्हणजे ऐनवेळी गडबड होत नाही. कोकण किनारपट्टी, दक्षिणेकडील भाग किंवा इतरही बऱ्याच भागात नारळ आवर्जून वापरला जातो. स्वयंपाकात नारळाचा वापर करायचा म्हणजे हा नारळ सोलणे, फोडणे, खोवून ठेवणे अशी बराची कामं करावी लागतात. इतर कामांच्या घाईत हे काम अनेकांना काहीसं अवघड वाटतं. मग ऐनवेळी नारळाचा वापर न करताच स्वयंपाक केला जातो. पण नारळाचा चव घातल्यावर पदार्थांना जी चव येते ती इतर कशानेच येत नाही. अनेकदा तर पोहे, उपमा, खिचडी अशा पदार्थांवरही आपण आवर्जून नारळ घेतो (How To Break Coconut Easy Trick by Chef Kunal Kapur).
नारळ फोडणे थोडे जिकरीचे किंवा जोर लावण्याचे काम असल्याने बहुतांशवेळा स्त्रिया हे काम पुरुषांना सांगतात. पण ते नसतील तर मात्र नारळ सोलायची पंचाईत होते. म्हणूनच आज आपण नारळ फोडण्याची एक अतिशय सोपी पद्धत पाहणार आहोत. प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ही पद्धत शेअर केली आहे. यामध्ये नारळ फोडण्यापासून ते खोबरं काढण्यापर्यंतच्या सगळ्या स्टेप्स अतिशय सोप्या पद्धतीने दाखवल्या आहेत. पाहूयात या आगळ्यावेगळ्या पद्धतीने नारळ कसा फोडायचा.
१. नारळाच्या शेंड्या काढायच्या आणि त्याला नैसर्गिकरित्या ३ ठिकाणी उभ्या रेघा असतात. त्याठिकाणी लाटणं किंवा बत्त्याने पुन्हा पुन्हा मारायचे. यामुळे नारळ फोडण्याचे काम काहीसे सोपे होते.
२. काहीवेळ असं केल्यानंतर कोणत्याही २ रेघांच्या मध्यभागी थोडं जोरात मारल्यावर नारळ अगदी सहज फुटेल.
३. हे करण्याआधी एक बाऊल आणि गाळणी घेऊन ठेवायचे म्हणजे नारळ फोडताना त्यावर धरला की आतले पाणी वाया न जाता ते लगेचच गाळले जाते.
४. यानंतर नारळाच्या वाटीला असलेलं खोबरं आपण सुरीने काढण्याचा प्रयत्न केला तर त्याचे तुकडे तुकडे निघतात. यासाठीच नारळाची पूर्ण वाटी निघावी म्हणून एक सोपी युक्ती आपण पाहणार आहोत.
५. गॅस लावून त्यावर ही नारळाची वाटी ठेवायची, गरम झाल्यामुळे आतली खोबऱ्याची वाटी कवटीपासून वेगळी होते आणि अगदी सहज निघून येते. त्यामुळे नारळाचे तुकडे करणे किंवा किसणे अगदी सोपे होते.