Join us  

आरसा चकाचक स्वच्छ पुसण्यासाठी ४ सोपे उपाय, डाग होतील गायब - धूसर आरसा उजळेल लख्ख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2024 7:45 PM

How to clean cloudy mirror : आरशाचे डाग, धुसरपणा काढण्याचे घरगुती उपाय, प्रतिबिंब दिसेल छान...

दिवाळीच्या साफसफाईत आपण भिंती, फर्निचर, फॅन, खिडक्या टॉयलेट, बाथरुम, कपाटं सगळं साफ करतो. मात्र शेवटी राहतो तो म्हणजे आपण सतत जाता येता ज्यामध्ये पाहतो तो आरसा. आपल्याला सतत आपलं प्रतिबिंब दाखवणारा हा आरसा स्वच्छ-चकाचक असेल तर त्यात पाहायला छान वाटते. नाहीतर त्यावर कसले ना कसले डाग पडलेले असतात. बरेचदा त्यावर पाण्याचे, मेकअपच्या सामानाचे, तेलाचे नाहीतर कसले ना कसले डाग असतातच. कधी या आरशावर टिकल्या चिकटवल्या जातात तर कधी वॉश बेसिनच्या आरशाला पेस्टचे नाहीतर दाढीच्या क्रिमचे डाग पडतात (How to clean cloudy mirror).

 हळूहळू आरसा अंधूक व्हायला लागतो आणि आपल्याला आरशात स्पष्ट दिसेनासे होते. मग आपण या आरशावर फडकं मारतो किंवा कापड ओले करुन आरसा पुसतो. पण त्यानेही हे सगळे डाग जातातच असं नाही. काहीवेळा या कापडाचे धागे आरशावर तसेच राहतात. आता हा आरसा छान स्वच्छ करायचा असेल तर नेमकं काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आज आपण त्यासाठीचे काही सोपे उपाय पाहणार आहोत. अगदी झटपट आरसा साफ करण्याच्या सोप्या ट्रिक्स पाहूया...

(Image : Google)

१. कापडापेक्षा कागदाने आरसा जास्त स्वच्छ निघतो. यासाठी आपण घरात असलेला कोणत्याही प्रकारचा कागद वापरु शकतो. पण टिश्यू पेपरसारखा मऊ कागद वापरला तर त्याने आरसा जास्त चांगला निघतो. गरज पडल्यास हा कागद थोडा ओला करुन घ्यावा, म्हणजे पुसणे सोपे जाते आणि डाग निघायला मदत होते. 

२. स्प्रे बॉटल ही आरसा पुसण्यासाठी चांगला पर्याय ठरु शकते. व्हिनेगर किंवा बेकींग पावडर घेऊन त्यात पाणी घालायचे आणि हे मिश्रण स्र्पे बाटलीने आरशावर फवारायचे. नंतर कॉटन पॅड, कापूस किंवा स्पंजने आरसा स्वच्छ पुसायचा. यामुळे आरशावरचे सगळे डाग निघून जाण्यास मदत होते. 

(Image : Google)

३.  आरशावर प्रमाणापेक्षा जास्त घट्ट डाग असतील तर लिंबाचा रस आणि पाणी एकत्र करुन पुसावे. टिकलीचे डाग किंवा इतक चिकट डाग निघण्यासाठी लिंबू अतिशय चांगला पर्याय ठरु शकतो. लिंबातील सायट्रिक अॅसिडने चिकटपणा निघण्यास मदत होते. 

४. ग्लिसरीन हे आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरतो. त्याचप्रमाणे आरसा स्वच्छ करण्यासाठीही वापरु शकतो. एखाद्या कापडावर किंवा कागदावर ग्लिसरीन घेऊन त्याने तो पुसला तर डाग आणि धुसरपणा निघून जातो. हा उपाय सोपा आणि झटपट असल्याने एकदा नक्कीच करुन पाहा. 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सदिवाळी 2024होम रेमेडी