Join us  

तांब्या पितळीची भांडी घासायला विकतच्या पावडरीपेक्षा भारी १ उपाय, भांडी होतील चकचकीत....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2023 1:15 PM

How to Clean Copper Utensils : घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यांचा वापर करून तांब्यांची भांडी घरच्या घरी लख्ख करू शकतो.

आपल्या घरात किचनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंची भांडी असतात. या धातूंमध्ये विशेषतः स्टील, तांबे, अ‍ॅल्युमिनियम यांसारख्या धातूंचा समावेश असतो. आपण शक्यतो रोजच्या वापरात स्टील, अ‍ॅल्युमिनियम यांसारख्या धातूंपासून तयार झालेलीच भांडी वापरतो. या धातूंपासून तयार झालेल्या भांड्यांची स्वच्छता ठेवणे फारच सोपे असते. आपल्या घरात तांबे या धातूंपासून तयार झालेली भांडी देखील असतात. यात वेगवेगळ्या वाट्या, ग्लास, पाण्याचा जग, ताट यांचा समावेश असतो. परंतु तांबे या धातूंपासून तयार झालेलं भांडी आपण रोजच्या वापरात काढत नाहीत. या भांड्यांची स्वच्छता ठेवणे फारच कठीण असते. म्हणून आपण ही भांडी रोजच्या वापरात काढत नाहीत. परंतु एक सोपा उपाय वापरून तुम्ही ही तांब्यांची भांडी सहज स्वच्छ करू शकता. घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यांचा वापर करून आपण तांब्यांची भांडी घरच्या घरी पितांबरी न वापरता लख्ख करू शकतो(How to Clean Copper Utensils).

साहित्य - 

१. दिवाळीतील पणत्यांची बारीक पूड करून घेणे -  १ टेबलस्पून२. लिंबाचा रस - १ टेबलस्पून३. मीठ - १ टेबलस्पून

khushimittalfoodie या इंस्टाग्राम पेजवरून घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यांचा वापर करून तांब्यांची भांडी कशी लख्ख करू शकतो याबद्दलचा उपाय शेअर केला आहे.   

 

नक्की काय आहे उपाय? 

१. आपल्या घरात दिवाळीत वापरलेल्या उरलेल्या मातीच्या पणत्या असतात. २. या मातीच्या पणत्या घेऊन एका किसणीवर त्या किसून त्यांची बारीक पूड करावी. ३. या मातीच्या पणत्या आपण ठेचून त्यांची बारीक पूड देखील करू शकतो. ४. भुगा करून घेतलेली मातीची पूड १ टेबलस्पून घ्यावी. यात १ टेबलस्पून मीठ आणि १ टेबलस्पून लिंबाचा रस घालावा. ५. हे सर्व मिश्रण चमच्याच्या मदतीने ढवळून एकत्रित करून घ्यावे. ६. हातांच्या सहाय्याने हे मिश्रण तांब्यांच्या भांड्यांवर लावून घ्यावे.७. हाताने हलकेच हे मिश्रण तांब्यांच्या भांड्यांवर चोळून घ्यावे. ८. आता पाण्याने हे भांडे स्वच्छ धुवून घ्यावे. 

हा एक सोपा उपाय घरच्या घरी करून आपण आपल्या घरातील तांब्यांची भांडी पितांबरी न वापरता पुन्हा नव्यासारखी चकचकीत करू शकतो.

टॅग्स :किचन टिप्स