घरातलं पायपुसणं ही घरातल्यांसाठी एक दुर्लक्षित गोष्ट असली तरी बाहेरून घरात येणाऱ्या व्यक्तीची नजर सगळ्यात आधी त्यावरच जाते आणि त्यावरून घर किती स्वच्छ टापटिप आहे, याचा अंदाज त्या बाहेरच्या माणसाला येत असतो.. याशिवाय सगळ्यांचे पाय आधी त्यावरच येणार आणि तिथूनच ते घरभर फिरणार असतात. त्यामुळे घरातली सगळीच आणि विशेष म्हणजे मुख्य दरवाजाजवळचं पायपुसणं नेहमी स्वच्छच पाहिजे. पायपुसणं नेमकं कसं स्वच्छ करावं, त्यासाठीच तर या काही खास टिप्स. (tips and tricks for cleaning door mat)
१. Rubber Backed Matting
अशा पद्धतीचे जे पायपुसणे असतात त्याला खालच्या बाजूने रबर लावलेलं असतं आणि वरच्या बाजूने छोटे छोटे रबरी पाईप असतात. अशा मॅटची स्वच्छता थोडी अवघड असते. दर ३- ४ दिवसांआड व्हॅक्युम क्लिनर वापरून अशा मॅट स्वच्छ कराव्यात. महिन्यातून एकदा माईल्ड डिटर्जंट वापरून ती स्वच्छ करावी. हेवी डिटर्जंट वापरू नये. तसेच ही मॅट खूप कडक उन्हात वाळवू नये.
२. Coir Matting
बेज, ब्राऊन या रंगात उपलब्ध असणाऱ्या या मॅट नारळाच्या शेंड्यापासून बनविलेल्या असतात. पाणी शोषून घेण्याची त्यांची क्षमता खूप जास्त असते. अशा मॅट स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा वापर करू नये. या मॅट स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी त्यातला कचरा, घाण व्हॅक्युम क्लिनरने स्वच्छ करा. त्यानंतर त्याला ड्राय वॉशिंग करावे. ड्राय वॉशिंगसाठी कॉर्न स्टार्च आणि बेकींग सोडा यांचे मिश्रण वापरू शकता. हे मिश्रण मॅटवर टाका. ३० मिनिटे तसेच राहू द्या. त्यानुंतर पुन्हा एकदा व्हॅक्यूम क्लिनरचा वापर करून मॅट स्वच्छ करून घ्या.
३. कापडी पायपुसणे
अशा पद्धतीचे पायपुसणे स्वच्छ करायला अतिशय सोपे असतात. महिन्यातून एकदा ते गरम पाण्यात थोडा बेकींग सोडा टाकून अर्धातास भिजत ठेवा. त्यानंतर तुम्ही ते हाताने धुवू शकता किंवा मशिन वॉश करू शकता. फक्त खूप आदळआपट न करता, ब्रश त्यावर न घासता ते सौम्यपणे धुवावे.
पायपुसण्याबाबत ही काळजी घ्या..
- खराब झाले नसले तरीही पायपुसणे दर २ वर्षांनी बदलावे.
- महिन्यातून एकदा डिप वॉश आणि आठवड्यातून एकदा व्हॅक्युम क्लिन जरूर करावे.
- पायपुसण्यांसाठी कधीही हार्ड डिटर्जंट वापरू नये.
- पायपुसणे पुर्णपणे वाळल्याशिवाय वापरायला घेऊ नका.