स्वयंपाकघरात कितीही आवरले आणि साफसफाई केली तरी पसारा होतोच. सकाळी उठल्यापासून आपण ओटा, गॅस यांवर काही ना काही करत असतो. नाश्ता, स्वयंपाक, चहा-कॉफी यांमुळे गॅसचा आणि ओट्याचा बराच वापर होतो. सगळं आवरुन झालं की आपण ओटा, गॅसची शेगडी सगळं स्वच्छ करुन ठेवतो खरं. पण गॅसच्या बर्नरमध्ये अडकलेली घाण मात्र कित्येक दिवस तशीच राहते. त्यामुळे पितळ्याचे असलेले हे बर्नर काही दिवसांनी नकळत काळेकुट्ट दिसायला लागतात. कधी यावर दूध ओतू जातं तर कधी तेल सांडतं. कधी थेट बर्नरवर फुलके भाजल्याने किंवा वांगे भाजल्याने त्याचे कणही त्यात अडकतात (How To Clean Gas Burner at Home).
त्यामुळे त्याचा मूळ रंग जाऊन हा बर्नर काळा दिसायला लागतो. इतकेच नाही तर त्यात घाण अडकल्याने गॅसची फ्लेमही नकळत लहान होते. त्यामुळे स्वयंपाकाला वेळ लागतो. अशावेळी हा काळा झालेला बर्नर साफ कसा करायचा हे कदाचित आपल्याला माहित नसेल. बडोदा येथील प्रसिद्ध फूड ब्लॉगर शिल्पी यांनी आपल्या माय एक्सपिरियन्स डायरीज या इन्स्टाग्राम पेजवर नुकताच याविषयीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्या बर्नर साफ करण्याची अतिशय सोपी पद्धत दाखवतात. ज्यामुळे अगदी ५ मिनीटांत हा बर्नर नव्यासारखा चकचकीत होतो. आता ही पद्धत नेमकी काय आहे ते पाहूया...
१. गॅसचे बर्नर काढून एका बाऊलमध्ये ठेवायचे. त्यामध्ये गरम पाणी आणि वरुन इनोचे १ पाकीट घालायचे.
२. १५ ते २० मिनीटे हा बर्नर बाऊलमध्ये तसाच ठेवून द्यायचा.
३. त्यानंतर बर्नर बाहेर काढून जुन्या झालेल्या टूथब्रशने घासायचे, त्यामुळे यात अडकलेली घाण निघून जाण्यास मदत होईल.
४. एका बाऊलमध्ये लिक्विड क्लिंजर घेऊन त्यात लिंबाचा रस घालायचा. टूथब्रशने हे मिश्रण बर्नरला लावून घासणीने हा बर्नर पुन्हा घासायचा.
५. गरम पाणी, व्हिनेगर आणि बेकींग सोडा एकत्र करुन त्यामध्ये हे बर्नर २० मिनीटे भिजवून ठेवायचे. नंतर बाहेर काढून कपड्याने कोरडे करायचे.