Join us  

गॅस शेगडी स्वच्छ करण्यात तासंतास जातात? १० मिनिटांत चकचकीत करा कळकट्ट शेगडी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2023 12:56 PM

How To Clean Gas Stove Tips by Chef Pankaj Bhadouria : एकदा शेगडीवरचे डाग वाळून गेले की ते लवकर निघत नाहीत.

स्वच्छता हे महिलांसाठी घरातील एक अतिशय महत्त्वाचे काम असते. घर, किचन सगळं स्वच्छ असेल तरच आपल्याला त्या घरात राहायला छान वाटते. आरोग्य चांगले राहावे यासाठीही ही स्वच्छता अतिशय महत्त्वाची असते. या स्वच्छतेच्या कामांमध्ये आपला बहुतांश वेळ जातो. ओटा साफ करणे, भांडी आवरणे, सिंक स्वच्छ ठेवणे आणि गॅस शेगडी साफ करणे ही स्वयंपाक घरातील नियमित करायला हवीत अशी काही महत्त्वाची कामे असतात. रोज ऑफीसला जाण्याची घाई असेल तर सकाळी आपण शक्य तितके आवरुन जातो आणि बाकीचे रात्री आल्यावर किंवा विकेंडला आवरतो (How To Clean Gas Stove Easily). 

पण गॅस शेगडी ही किचनमधली सर्वात घाण होणारी गोष्ट असून ती साफ करणे हा एक मोठा टास्क असतो. शेगडीवर आपण स्वयंपाक करत असल्याने त्यावर सतत दूध, फोडणी आणि इतर काही ना काही सांडत असते. यामुळे शेगडी आणि बर्नर, त्याच्या आजुबाजचा भाग खराब होतो. शेगडीवर अन्न सांडलेले राहिले किंवा ती कळकट्ट राहीली तर त्यावर मुंग्या, झुरळं होतात. एकदा हे डाग वाळून गेले की ते लवकर निघतही नाहीत. मग ही शेगडी घासण्यासाठी आपल्याला बराच जोर लावावा लागतो आणि त्यामध्ये आपली बरीच ऊर्जाही खर्च होते. प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया यांनी पंकज के नुसके यामध्ये गॅस शेगडी साफ करण्याची सोपी ट्रीक सांगितली आहे. पाहूया ही ट्रीक कोणती...

(Image : Google)

१. एका बाऊलमध्ये आवश्यकतेनुसार बेकींग सोडा घ्या.

२. त्यामध्ये हा सोडा भिजेल आणि चांगली पेस्ट तयार होईल इतकेच व्हिनेगर घाला.

३. व्हिनेगर घातल्यानंतर यामध्ये भरपूर बुडबुडे येतील. 

४. मग गॅस शेगडीवरुन बर्नर, बाजूच्या प्लेटस हे सगळे बाजूला काढायचे. 

५. शेगडीवर ज्याठिकाणी खराब झाली आहे तिथे आपण तयार केलेली पेस्ट घालायची.

६. स्क्रबरच्या मदतीने ही पेस्ट गॅस शेगडीवर पसरवायची. 

७. त्यानंतर २० मिनीटे ही पेस्ट शेगडीवर आहे तशीच ठेवायची. 

८. २० मिनीटांनंतर गॅस स्क्रबरने स्वच्छ घासायचा.

९. त्यानंतर ओल्या फडक्याने शेगडी स्वच्छ पुसून घ्यायची, मग ती एकदम चकाचक दिसते. 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सकिचन टिप्स