प्रत्येकाला सोनं किंवा चांदीचे दागिने (Ornaments) घालण्याची आवड असते. याव्यतिरिक्त लोकं आर्टिफिशियल दागिने देखील घालतात. परंतु ओरिजिनल असो किंवा आर्टिफिशियल प्रत्येक दागिना एका कालावधीनंतर काळपट पडत जातो. सोन्या-चांदीचे दागिने काळपट पडल्यानंतर त्यांना स्वच्छ करण्यासाठी सराफाकडे घेऊन जायला लागते.
मात्र, सराफाकडे घेऊन गेल्यानंतर खूप खर्चही होतो. पण आपण चहापत्तीचा वापर करून दागिने स्वच्छ करू शकता. आता तुम्ही म्हणाल चहापत्तीच्या वापराने दागिने स्वच्छ होऊ शकतात का? आपण चहापत्तीच्या वापराने घरातील सोन्या, चांदीचे दागिने स्वच्छ करू शकता ते कसे पाहूयात(How to Clean Gold and Silver Jewelry at Home, by using tea powder).
चहापत्तीने चांदी कसे स्वच्छ करायचे?
चांदी स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात चहापत्ती घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. त्यानंतर पाणी गाळून एका भांड्यात काढून ठेवा. आता चहापत्तीच्या पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा व एक चमचा डिटर्जेंट घालून मिक्स करा. त्यात काळपट पडलेले चांदीचे दागिने घालून ठेवा. १० मिनिटानंतर दागिने पाण्यातून बाहेर काढा. नंतर दागिने ब्रशने घासून काढा. नंतर सामान्य पाण्याने चांदी स्वच्छ धुवून काढा. या टीपमुळे चांदीचे दागिने काही मिनिटात स्वच्छ होतील.
चहापत्तीने सोनं कसे स्वच्छ करायचे?
सोन्याचे दागिने अधिक काळपट पडले असतील तर, चहापत्तीच्या पाण्याने ते स्वच्छ होतील. यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ चमचे चहापत्ती घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. त्यानंतर पाणी गाळून एका भांड्यात काढून ठेवा. चहापत्तीचे पाणी थंड झाल्यानंतर त्यात एक चमचा बेकिंग सोडा, डिटर्जेंट व अर्धा चमचा हळद घालून मिक्स करा. नंतर त्यात सोन्याचे दागिने घाला. १० मिनिटानंतर दागिने बाहेर काढून ब्रशने स्वच्छ घासून काढा. या उपायामुळे काही मिनिटात दागिने स्वच्छ होतील.