Join us  

सोन्या-चांदीचे दागिने काळे पडले? दागिने साफ करण्याची १ सोपी ट्रिक, दागिने चमकतील नव्यासारखे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 4:21 PM

How To Clean Gold and Silver Ornaments at Home : दागिन्यांना एकप्रकारची नवी झळाळी येण्यास मदत होईल आणि आपल्यालाही या दागिन्यांकडे पाहून छान वाटेल.

आपण रोजच्या वापराला सोन्याचे लहान मंगळसूत्र, चेन, कानातले असे काही ना काही आवर्जून वापरतो. इतकेच नाही तर चांदीची जोडवी, पैंजण, ब्रेसलेट असेही वापरतो. रोजच्या रोज या वस्तू वापरुन त्या काहीशा काळ्या पडायला लागतात. सतत येणारा घाम, प्रदूषण, धूळ यांच्याशी संपर्क आल्याने या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे पॉलिश जाते आणि त्याची चकाकी कमी होते. धावपळीत अनेकदा आपल्या हे लक्षातही येत नाही. मात्र इतर कोणाचा एखादा दागिना पाहिला की आपण घातलेल्या गोष्टी किती काळ्या पडल्या हे आपल्या लक्षात येते (How To Clean Gold and Silver Ornaments at Home).

अशावेळी आपले दागिने स्वच्छ करण्यासाठी ते सोनाराकडे देऊन पॉलिश करण्याचा पर्याय असतोच. पण यासाठी बरेच पैसे लागतात. विशेष पैसे खर्च न करताही घरच्या घरी आपले रोजच्या वापरातले दागिने चमकावेत असे वाटत असेल तर आज आपण एक सोपी ट्रिक पाहणार आहोत. त्यामुळे दागिन्यांना एकप्रकारची नवी झळाळी येण्यास मदत होईल आणि आपल्यालाही या दागिन्यांकडे पाहून छान वाटेल. पाहूयात दागिने साफ करण्याची सोपी ट्रिक...

१. एका पातेल्यात साधारण ग्लासभर पाणी घेऊन त्यात २ चमचे चहा घालून तो चांगला उकळावा. 

२. या पाण्याचा रंग बदलून चहाचा अर्क पाण्यात उतरल्यानंतर तो गाळून घ्यावा. 

३. हे चहाचे पाणी २ बाऊलमध्ये वेगळे करावे आणि एका बाऊलमध्ये बेकिंग सोडा घालावा. 

४. बेकींग सोडा घातलेल्या बाऊलमध्ये काही प्रमाणात बुडबुडे येतील त्यात चांदीचे दागिने घालावेत. यात जोडवी, पैंजण, कॉईन्स आणि इतर कोणत्याही चांदीच्या गोष्टी घालू शकतो. 

५. चांदीच्या दागिन्यांवर जमा झालेले ऑक्सिडायजेशन कमी होऊन दागिने चमकण्यास याची चांगली मदत होते.

६. आता दुसऱ्या बाऊलमध्ये असलेल्या चहाच्या पाण्यात थोडी हळद घालावी आणि हे पाणी चांगले एकजीव करुन घ्यावे. 

७. या हळद घातलेल्या पाण्यात सोन्याचे मंगळसूत्र, कानातले, अंगठ्या, बांगड्या किंवा इतरही दागिने घालून ठेवावेत.

८. काही वेळ हे दागिने पाण्यात भिजल्यावर खराब झालेल्या टुथब्रशने हे दागिने हळूवार घासावेत, त्यामुळे त्यावरचा मळ निघून जाण्यास मदत होते. 

९. घासल्यानंतर हे दागिने पुन्हा एकदा चहाच्या पाण्यात आणि मग साध्या पाण्यात घालावेत. त्यामुळे या दागिन्यांना नव्यासारखी झळाळी येण्यास मदत होते. 

टॅग्स :सोशल व्हायरलदागिनेस्वच्छता टिप्स