किचन सिंक ही घरात सर्वात जास्त वापरली जाणारी जागा. स्वयंपाकघरात असणाऱ्या या सिंकमध्ये भाजीपाला धुण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंतच्या असंख्य गोष्टी दिवसभर केल्या जातात. सतत पाणी, खरकटे, चहाचा गाळ असे काही ना काही असल्याने हे सिंक कधी तुंबते आणि पाणी साठून राहते. मग आपण तात्पुरते काहीतरी घरगुती उपाय करुन हे साचलेले पाणी कसे खाली जाईल असा ट्राय करतो. तसेच याठिकाणी खरकटे अन्न असल्याने वास येणे, चिकट होणे अशाही समस्या निर्माण होतात. त्यामुळे रोजच्या रोज हे सिंक साफ करणे एक अतिशय महत्त्वाचे काम असते. सिंक हे ओट्याच्या बाजूलाच असल्याने आरोग्याच्या दृष्टीनेही ते साफ असणे गरजेचे असते. हे सिंक नीट साफ राहावे आणि पाणी तुंबून वास येऊ नये यासाठीच आज आपण १ सोपी युक्ती पाहणार आहोत (How To Clean Kitchen Sink Cleaning Tips).
आपण सिंकमध्ये हात धुतो, भांडी घासतो किंवा डाळी, धान्य आणि भाजीपाला धुतो. त्यावेळी हजारो बॅक्टेरीया या सिंकच्या तोंडाशी जमा होतात. हे बॅक्टेरीया पाईपमध्ये अडकून राहतात आणि मग सिंक तुंबण्याची समस्या उद्भवते. मग अचानक आपली पळापळ होते आणि हे सिंक साफ करण्यासाठीचे शक्य ते सगळे पर्याय आपण ट्राय करतो. काहीवेळा हे पर्याय उपयुक्त ठरतात मात्र काहीवेळा त्यांचा काहीच उपयोग होत नाही. अशावेळी घरच्या घरी करता येईल असा १ सोपा उपाय केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. हा उपाय केवळ सिंकसाठीच नाही तर बाथरुमचे आऊटलेट, वॉश बेसिन अशा सगळ्यांसाठी उपयुक्त ठरतो.
उपाय काय?
चमचाभर मीठ घेऊन ते सिंकच्या तोंडाशी टाका. काही वेळ ते तसेच राहूद्या आणि मग यावर गरम पाणी घाला. यामुळे किचन सिंकच्या पाईपमध्ये आण तोंडाशी अडकलेली घाण निघून जाण्यास मदत होईल. तसेच या उपायाने सिंक तुंबण्याची समस्याही दूर होईल. त्यामुळे घाण अडकून पाणी तुंबणार नाही. घरच्या घरी करता येणारा अतिशय सोपा उपाय असल्याने यासाठी फारसे कष्ट किंवा खर्चही होत नाही. बाजारात सिंकमध्ये घालण्यासाठी महागड्या पावडर उपलब्ध असतात. मात्र त्या आणणे अनेकदा आपल्या लक्षात राहत नाही. तसेच त्यांची किंमत जास्त असल्याने खर्चही जास्त होतो.