बऱ्याच घरांच्या खिडक्यांवर बाहेरच्या बाजुने तारेची बारीक जाळी बसवली जाते. संपूर्ण खिडकीवर ती जाळी असते. बाहेरचे डास, माशा घरात येऊ नयेत, म्हणून संरक्षणाच्या दृष्टीने ती जाळी बसवली जाते. पण काही महिन्यांतच बाहेरची धूळ बसून बसून ती जाळी खूपच काळपट पडते. त्यामुळे मग घरातही पुरेसा प्रकाश येत नाही आणि खिडकी अगदीच अस्वच्छ दिसू लागते. म्हणूनच ही जाळी अगदी कमी मेहनतीत झटपट कशी स्वच्छ करायची, ते पाहूया... (How to clean mosquito net on windows)
खिडक्यांची जाळी स्वच्छ करण्याचा उपाय
खिडक्यांची जाळी स्वच्छ करण्यासाठी कोणता उपाय करावा, याची माहिती housewife_to_homemaker या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला डिशवॉश लिक्विड, व्हिनेगर आणि पाणी एवढंच साहित्य लागणार आहे.
सगळ्यात आधी एका भांड्यात २ ते ३ टेबलस्पून डिशवॉश लिक्विड घ्या. त्यामध्ये अर्धा कप व्हिनेगर आणि १ कप पाणी टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.
यानंतर खिडकीच्या जाळीवर थोडं पाणी शिंपडून ती ओलसर करून घ्या. ओलसर झालेल्या जाळीवर आता आपण तयार केलेलं मिश्रण शिंपडा आणि २ ते ३ मिनिटे ते तसंच राहू द्या.
यानंतर एखादी घासणी घेऊन जाळी घासून काढा. नंतर स्वच्छ पाण्याने पुसून घ्या. जाळी स्वच्छ झालेली असेल.
ब्रेड न वापरता करा भरपूर प्रोटिन्स देणारं सुपरहेल्दी सॅण्डविच- मुलांनाही आवडेल, बघा रेसिपी
जाळी जर खूपच घाण झालेली असेल तर घासणीच्या ऐवजी तुम्ही कपडे धुण्याचा ब्रश वापरून पाहा. यामुळे जाळीमध्ये कितीही घाण अडकलेली असेल, तरी ती लगेच स्वच्छ होऊन जाईल.
स्वयंपाक घराच्या खिडकी जाळ्या इतर जाळ्यांच्या तुलनेत जरा जास्तच तेलकट, मेणचट झालेल्या असतात. अशा जाळ्या स्वच्छ करण्यासाठी थोडं स्ट्राँग मिश्रण तयार करावं. त्यासाठी व्हिनेगर आणि डिशावॉश लिक्विडचं प्रमाण थोडं वाढवा आणि मग जाळी घासून स्वच्छ करा.