स्वयंपाकघरात सर्वात जास्त वापरलं जाणारं भांडं म्हणजे कढई. ॲल्युमिनियमची असू देत किंवा लोखंडाची. साधं भाजण्याच्या कामापासून तळणीसाठी कढईचा वापर केला जातो. स्वयंपाक करताना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ केले जातात. कधी जास्त मसाल्याच्या भाज्या असतात. कधी तळण काढलं जातं. यामुळे कढयांना मसाल्याचे डाग राहातात. कढया मधून आणि बाहेरुन तेलकट होतात. अशा कढया घासताना हात दुखून येतात, पण कढया काही निघत नाहीत. तेलकट, मसाल्याचे डाग असलेल्या कढया परत परत वापरल्यास कढयांवर आतून बाहेरुन तेलकट थर (oily and burnt kadai) चढतो आणि तो घट्ट होतो. असं होवू नये आणि वेळच्या वेळी तेलकट कढया स्वच्छ होण्यासाठी ( how to clean oily and burnt kadai) काही सोप्या युक्त्या वापरल्यास कढयांवरचे तेलकट थर सहज निघून जातात.
Image: Google
जळलेल्या- तेलकट कढया स्वच्छ करण्यासाठी..
1. व्हिनेगर आणि पाण्याचा वापर करुन जळलेल्या, तेलकट कढया स्वच्छ करता येतात. यासाठी एका भांड्यात अर्धा कप व्हिनेगर आणि अर्धा कप पाणी घालावं. हे चांगलं मिसळून घ्यावं. हे मिश्रण कढईत घालावं. ते कढईत 10 मिनिटं तसंच ठेवावं. मग कढई गॅसवर ठेवून त्यातलं मिश्रण 2 मिनिटं गरम करावं. नंतर गॅस बंद करुन कढईतलं पाणी काढून घ्यावं आणि कढई नेहेमीप्रमाणे घासणीनं घासून घ्यावी.
2. कढई खूपच तेलकट असल्यास ती स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर आणि कांद्याचा रस वापरावा. एका भांड्यात कांद्याचा रस काढून घ्यावा. नंतर त्यात 1 कप गरम पाणी घालावं. यात 1-2 चमचे बेकिंग सोडा आणि थोडं व्हिनेगर घालावं. हे चांगलं मिसळून ते कढईत घालावं. थोडा वेळ हे मिश्रण कढईत तसंच ठेवावं. थोड्या वेळानं कढई घासणीनं घासून घ्यावी.
Image: Google
3. व्हिनेगर आणि इनोचा वापर करुनही कढई स्वच्च करता येते. यासाठी कढई सर्वात आधी गॅसवर ठेवावी. कढईत पाणी घालावं. त्यात इनो, व्हिनेगर घालावं. 15 मिनिटं पाणी गरम होवू द्यावं. नंतर कढईतलं पाणी काढून टाकून कढई छोट्या दगडानं हलकीशी घासून घेतल्यास तेलकट कढईही झटक्यात स्वच्छ होते.
4. जळालेली कढई स्वच्छ करताना कढईमध्ये 1 चमचा बेकिंग सोडा घालावा. नंतर त्यात 2 चमचे व्हिनेगर आणि 2 कप गरम पाणी घालावं. थोडा वेळ मिश्रण कढईत राहू द्यावं. नंतर स्टीलच्या घासणीनं कढई घासून घेतल्यास ती स्वच्छ होते.
Image: Google
5. घरात सोडा, व्हिनेगर यापैकी काहीही नसल्यास केवळ मीठ आणि पाण्याचा वापर करुनही जळलेली कढई स्वच्छ करता येते. कढईत पाणी आणि मीठ घालून कढईतलं पाणी उकळून घ्यावं. नंतर कढई घासणीनं घासून स्वच्छ करावी.