मुलांचे शाळेचे कपडे पांढरे असतात. आपल्यालाही अनेकदा फॉर्मल म्हणून पांढरेच कपडे घालायला आवडतात. पांढऱ्या कपड्यांत रुबाबदार दिसतो म्हणून कार्यकर्ते, राजकारणी, शिक्षक असे अनेक जण पांढरे कपडे वापरण्याला पसंती देतात. मात्र पांढऱ्या कपड्यांवर सहज डाग पडतात आणि एकादा डाग पडला की हा डाग जात नाही तोपर्यंत आपल्याला हा कपडा वापरता येत नाही. बरेच प्रयत्न करुन आपण हे डाग काढायचा प्रयत्न करतो किंवा बरेच पैसे खर्च करुन हे डाग पडलेले कपडे़ बाहेर ड्रायक्लिनिंगला टाकतो. मात्र तरीही हे डाग गेले नाहीत तर आपण कपडे टाकून देतो. कधी हे डाग घामाचे असतात तर कधी तेलाचे. कधी चहा-कॉफीचे तर कधी ऑईलचे. जर तुमच्याही कपड्यांवर अशाप्रकारचे डाग पडले असतील आणि आपल्याला ते डाग घरच्या घरी काढायचे असतील तर काही सोप्या युक्त्या वापरता येऊ शकतात (How to clean stain on white clothes).
लिंबाचा रस
पांढऱ्या कपड्यांवरील डाग दूर करण्यासाठी आपण लिंबाच्या रसाचा वापर करु शकता. लिंबू साधारणपणे आपल्या घरात असते किंवा बाजारातही अगदी स्वस्तात उपलब्ध होते. यासाठी ज्याठिकाणी डाग पडला आहे त्या भागावर लिंबू डाग 3-5 मिनिटे घासायचे. त्यानंतर आपण कपडा ज्यापद्धतीने खळबळतो तसा धुवून टाकायचा. या पद्धतीने साधारणपणे सर्वप्रकारचे डाग सहज निघून जाण्यास मदत होते.
बेकींग सोडा
बेकींग सोडा हा स्वच्छतेच्या बऱ्याच कामांसाठी नेहमी वापरला जाणारा एक पदार्थ आहे. कपड्यांवर जेवताना कधी भाजी सांडते किंवा कधी आणखी काही. पदार्थांमध्ये तेल आणि हळद असल्याने हे डाग कपड्यावर चिकटून राहतात. लहान मुलांच्या कपड्यांवर किंवा अगदी मोठ्यांच्याही कपड्यावर हे डाग सर्रास दिसतात. या डागांवर थोडासा बेकींग सोडा घेऊन तो घासल्यास हे डाग निघून जाण्यास मदत होते. याशिवाय बेकींग पावडर घातलेल्या पाण्यात डाग पडलेले कपडे भिजवून ठेवल्यासही डाग निघून जाण्यास मदत होते.
ब्लीच पावडर
ब्लिच पावडर गार पाण्यात मिक्स करुन त्यात डाग पडलेले पांढरे कपडे १५ ते २० मिनीटांसाठी भिजवून ठेवावेत. त्यानंतर कपडे बाहेर काढून ते नेहमी धुतो तसे धुवावेत. यामुळे कपड्यांवर पडलेले वेगवेगळ्या प्रकारचे डाग निघून जाण्यास मदत होते. हा अतिशय सोपा आणि जुना उपाय आहे. याबरोबरच कपडे घरात वाळत घालण्यापेक्षा ते उन्हात वाळत घालावेत म्हणजे ते पिवळे पडत नाहीत. तसेच कपडे उन्हात वाळत घातल्याने त्याला येणारा वासही निघून जाण्यास मदत होते.