आळस घालवून रिफ्रेश होण्यासाठी आपण चहा, कॉफी पिणे पसंत करतो. आजकाल चहा, कॉफी झटपट बनवण्यासाठी बाजारांत इलेक्ट्रिक केटली मिळते. या केटलीचा वापर करून आपण ऑफिसमध्ये किंवा घरी चुटकीसरशी चहा, कॉफी बनवू शकतो. या इलेक्ट्रिक केटलीमध्ये आपण आपल्याला हवे तेव्हा झटपट गरम पाणी देखील तयार करून ठेवू शकतो. चहा, कॉफी बनवण्यासाठी आपण गॅस शेगडीचा देखील वापर करतो. परंतु आता बदलत्या काळानुसार चहा, कॉफी बनवण्यासाठी इलेक्ट्रिक केटलीलाच अनेकांनी पसंती दर्शविली आहे.
या इलेक्ट्रिक केटलीमध्ये पाणी ठेवून ते गरम झाल्यावर त्यात दूध, साखर, चहा पावडर किंवा कॉफी घातल्यास झटपट ५ मिनिटात आपल्यासमोर चहा, कॉफी तयार असते. ही इलेक्ट्रिक केटली चहा, कॉफी जरी झटपट बनवून देत असली तरी या इलेक्ट्रिक केटलीची सफाई करण तेवढंच अवघड काम आहे. या इलेक्ट्रिक केटलीच्या खालच्या भागात इलेक्ट्रिक स्विच असल्याकारणाने आपण या केटलीला नेहमीच्या भांड्यांप्रमाणे नळाखाली धरून धुवू शकत नाही. मग अशावेळी ही इलेक्ट्रिक केटली स्वच्छ कशी करावी? असा प्रश्न आपल्याला पडतो. ही इलेक्ट्रिक केटली स्वच्छ करण्यासाठी काही खास टीप्स(Electric Kettle Cleaning Tricks At Home).
इलेक्ट्रिक केटली कशी स्वच्छ करता येईल ?
१. व्हिनेगर - इलेक्ट्रिक केटलीची आतून सफाई करण्यासाठी आपण व्हिनेगरचा वापर करू शकतो. या इलेक्ट्रिक केटलीला स्वच्छ करण्यासाठी यात २ टेबलस्पून व्हिनेगर घालावे. व्हिनेगर घातल्यावर आता ही केटली संपूर्ण भरेल इतके पाणी त्यात घ्यावे. मग ही केटली ऑन करून त्यातील पाणी आणि व्हिनेगरचे मिश्रण चांगले उकळवून घ्यावे. काही काळासाठी हे मिश्रण त्या इलेक्ट्रिक केटलीमध्ये तसेच ठेवून द्यावे. काही वेळाने हे पाणी ओतून द्यावे. मग ही इलेक्ट्रिक केटली स्वच्छ सुती कापडाने पुसून घ्यावी. या उपायामुळे केटलीतील खराब दुर्गंधी नाहीशी होईल.
२. बेकिंग सोडा - बेकिंग सोडा हा देखील इलेक्ट्रिक केटली स्वच्छ करण्यासाठीचा एक उत्तम उपाय आहे. केटेलमध्ये २ टेबलस्पून बेकिंग सोडा घालावा. आता त्यात पाणी भरून घ्यावे. काही काळ हे बेकिंग सोडा आणि पाण्याचे मिश्रण तसेच ठेवून द्यावे. काही वेळानंतर स्क्रबरच्या मदतीने आणि बेकिंग सोड्याच्या मिश्रणाने ही इलेक्ट्रिक केटली घासून घ्यावी. बेकिंग सोड्याच्या वापराने केटली स्वच्छ होऊन चमकू लागेल.
३. लिंबू - वारंवार चहा, कॉफी बनवून इलेक्ट्रिक केटलीमध्ये फारच कुबट वास येत असेल तर लिंबूचा नक्की वापर करा. इलेक्ट्रिक केटलीमध्ये लिंबाचा रस आणि लिंबाच्या सालींचे छोटे छोटे तुकडे करून घालावेत. त्यानंतर यात पाणी घालून हे पाणी उकळवून घ्यावे. थोड्या वेळाने हे पाणी फेकून द्यावे. लिंबामुळे या केटलीमधील चहा, कॉफीचे चिकट डाग व दुर्गंधी निघून जाण्यास मदत होईल.
४. डिश वॉश लिक्विड - इलेक्ट्रिक केटली स्वच्छ करण्यासाठी आपण डिश वॉश लिक्विडचा देखील वापर करू शकता. इलेक्ट्रिक केटलीमध्ये पाणी घेऊन त्यात डिश वॉश लिक्विडचे ६ ते ७ थेंब घाला. त्यानंतर एका स्पंजच्या मदतीने ही केटली स्वच्छ धुवून घ्यावी. डिश वॉश लिक्विडने केटली धुतल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून घ्यावी.
इलेक्ट्रिक केटलीची अशी घ्या काळजी :-
१. इलेक्ट्रिक केटलीमध्ये कायमसाठी पाणी भरून ठेवू नका. केटलमध्ये सारखे पाणी भरून ठेवल्यामुळे त्यात असणारा हिटिंग इलेक्ट्रिक स्विच खराब होण्याची शक्यता असते.
२. आठवड्यातून किमान एकदा तरी ही केटल स्वच्छ करावी. ही केटल फक्त आतूनच नाही तर बाहेरून देखील स्वच्छ करावी.
३. केटल स्वच्छ करताना ती वाहत्या पाण्याखाली जसे की नळाखाली धरून धुवू नये. या केटलीच्या बाहेर इलेक्ट्रिक स्विच असते किंवा हीटिंग पॉईंट असतो जर का चुकून त्यात पाणी गेले तर ही इलेक्ट्रिक केटल बिघडून खराब नवण्याची शक्यता असते.