चहा म्हणजे भारतीयांसाठी एकप्रकारे अमृतच. अनेकांना सकाळी झोपेतून उठल्या उठल्या चहा लागतो. तर काहींना ऑफीसमध्ये काम करताना दर काही वेळाने चहा घेतल्याशिवाय काम सुधरत नाही. घरात कोणी पाहुणे आले की आपण त्यांना पाणी आणि चहा आवर्जून देतोच. आपल्याला कोणाला भेटायला बाहेर जायचे असेल तर १ कप चहा आवर्जून घेतला जातो. थंडीच्या दिवसांत तर गरमागरम चहा आवर्जून प्यायला जातो. यामध्ये आता ब्लॅक टी, लेमन टी, ग्रीन टी असे बरेच प्रकार निघाले असले तरी पारंपरिक चहा तो चहाच. याच चहासाठी आवर्जून लागणारी गोष्ट म्हणजे गाळणी. चहाची ही गाळणी दिवसांतून कित्येकदा चहा गाळण्यासाठी वापरली जाते (How To Clean Tea Strainers Cleaning Tips by Pankaj Bhadouria).
चहा गाळल्यानंतर आपण कप-बशा धुतो त्याचप्रमाणे ही गाळणीही धुतो पण ती म्हणावी तितकी स्वच्छ निघतेच असं नाही. या गाळणीत चहाचे लहान लहान कणही अनेकदा अडकून बसतात आणि ते घासणीने कितीही घासले तरी हे अडकलेले कण निघत नाहीत. मग काही दिवसांनी ही गाळणी काळीकुट्ट दिसायला लागते. आता ही गाळणी व्यवस्थित स्वच्छ होणे आरोग्याच्या दृष्टीने आणि स्वच्छतेच्या दृष्टीनेही आवश्यक असते. मग ही चाळणी स्वच्छ कशी करायची याची १ सोपी ट्रीक आज आपण पाहणार आहोत. प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया आपल्याला नेहमी वेगवेगळ्या रेसिपी आणि स्वयंपाकघरातील काही टिप्स देत असतात. आताही त्यांनी ‘पंकज के नुसके’ मध्ये गाळणी साफ कशी करायची याबाबतचा एक व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे.
कशी साफ करायची गाळणी ?
१. चहाची काळी झालेली गाळणी गॅस लावून त फ्लेमवर दोन्ही बाजुने चांगली गरम करायची.
२. त्यात जमा झालेले सगळे कण जळून जातात आणि त्यांचे कार्बनमध्ये रुपांतर होते.
३. मग ही गाळणी पूर्ण गार झाली की त्यावर लिक्विड सोप घालून ती घासणीने स्वच्छ घासायची.
४. गाळणी इतकी चकचकीत स्वच्छ होते की तिचा काळेपणा जाऊन ती नव्यासारखी दिसायला लागते.